- प्रा. रूपेश पाटील.
कुडाळ : ‘फक्त एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह’ अशी संपूर्ण राज्यभर ख्याती असलेले दमदार कार्यसम्राट आमदार म्हणजे निलेश नारायणराव राणे. आपण केलेली मदत कधीही कुणाला न सांगता फक्त आपण आपले कार्य करत राहायचे, ही आमदार निलेश राणे यांची खासियत. मात्र आमच्यासारख्या शोध पत्रकारिता करणाऱ्या काही पत्रकार बांधवांकडून योग्य व अयोग्य दोन्ही गोष्टींचं वेळोवेळी वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले जाते आणि या दोन्ही बाबतीत सरस ठरतात ते म्हणजे कुडाळ – मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे.
“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले!” या समर्थांच्या उक्तीप्रमाणे काम करणारे आमदार निलेश राणे यांनी अनेकदा गरजू आणि वंचित असलेल्या रुग्णांसाठी नेहमीच भरभक्कम आधार दिला आहे. नुकतेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आमदार निलेश राणे यांनी निखिल मधुसूदन सातार्डेकर या युवकाला शस्त्रक्रियेसाठी निधी मिळवून दिल्याबद्दल निखिल सातार्डेकर याने आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
निखिल मधुसूदन सातार्डेकर हा युवक आर्थिकदृष्ट्या अडचणीत होता. त्याच्या डाव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ही शस्त्रक्रिया होत नव्हती.
दरम्यान, शिवसेनेचे ओरोस विभागाचे प्रमुख दीपक नारकर व बावचे माजी सरपंच नागेश परब यांनी ही बाब आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या युवकाला मदत मिळवून दिली. याबद्दल निखिल सातार्डेकर याने आभार पत्राच्याद्वारे आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
“या मदतीमुळे माझ्या पायाची शस्त्रक्रिया वेळेवर झाली आणि मी पुन्हा चालू शकलो, आदरणीय निलेशजी यांचे आभार कसे मानावेत?, आजन्म ऋणी राहीन .!” असे त्याने आपल्या आभार पत्रात म्हटले आहे.


