टोकियो : जपानमध्ये बोइंग 737 या विमानाचा अपघात थोडक्यात टळला. बोइंगच्या या विमानाने चीनवरुन उड्डाण केलं. जपानची राजधानी टोकियो येथे हे विमान चाललं होतं. शंघाय येथून उड्डाण केल्यानंतर विमानात अचानक बिघाड झाला. विमान वेगाने खाली येऊ लागलं. जवळपास 26 हजार फुटावरुन विमान अचानक खाली आलं. प्रवाशांसाठी हा अनुभव धडकी भरवणारा होता. प्रवाशांनी लगेच निरोपाचा संदेश लिहायला सुरुवात केली. सुदैवाने विमानाचं जमिनीवर सेफ लँडिंग झालं. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार या बोइंग विमानात 191 प्रवासी होते. चालक दलाची सदस्य संख्या जोडून एकूण 200 च्या आसपास लोक विमानात होते. बहुतांश प्रवासी चीनचे होते. ते जपानमधील टोक्यो येथे चाललेले. जपान सरकारनुसार केबिनमध्ये काही टेक्निकल फॉल्टची समस्या आली. पायलट ती समस्या दूर करत असताना विमान 10 मिनिटात 26 हजार फुटावरुन खाली आणण्यात आलं. विमानाच्या केबिनमध्ये हवेचा दबाव ठेवणाऱ्या प्रेशरायजेशन सिस्टमच्या फॉल्टबद्दल अलर्ट जारी करण्यात आला. पायलटने त्या बद्दल एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संपर्क साधला.
फ्लाइट खाली येताच एअर हॉस्टेसने वॉर्निंग जारी केली. वॉर्निंग ऐकताच फ्लाइटमध्ये एकच गडबड, गोंधळ सुरु झाला. लोकांनी आरडा, ओरडा सुरु केला. काही लोकांनी लगेच सोशल मीडियावर पोस्ट सुरु केल्या. एका प्रवाशाने विमान खाली येताना पाहून लिहिलं की, “माझं शरीर इथेच आहे. माझे पाय थरथरतायत. जेव्हा तुम्ही जीवन, मृत्यूचा सामना करता, तेव्हा सगळं तुच्छा वाटतं” लँडिंग केल्यानंतर विमान तासभर तिथेच होतं. लोकांना त्यानंतर बाहेर काढण्यात आलं. जपान एअरलाइन्सने प्रवाशांना नुकसानभरपाईपोटी 10 हजार रुपये देण्याची तयारी दाखवली आहे. एअरलाइन्स कंपनीने या बद्दल खेद व्यक्त केला.


