सावंतवाडी : तालुक्यातील संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे या शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व रुजवण्यासाठी आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशालेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर महर्षी व्यास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत गुरुवंदना सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करणारी सुंदर गाणी, कविता आणि भाषणे सादर केली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर तो गुरुंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारे शिल्पकार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते.”, असे त्या म्हणाल्या.
शिक्षकांच्या वतीने सहाय्यक शिक्षक मनिष सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि त्यांना नेहमी ज्ञानाची कास धरून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये आपल्या गुरुंबद्दल आदर आणि आपुलकीची भावना निर्माण करणारा ठरला.



