नवी दिल्ली : कोरोना काळाआधी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना रेल्वे प्रवासावर मिळणारी ४० टक्के सवलत पुन्हा पूर्ववत सुरू करावी, अशी ठाम मागणी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पत्रकार संघटनेने केली आहे. या मागणीसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर शरदराव काळे यांनी केंद्र सरकारकडे विशेष पुढाकार घेतला असून, केंद्रीय रेल्वे, संचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेऊन अधिकृत निवेदन त्यांना सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, “कोरोनापूर्व काळात अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पत्रकार परिषद, शासकीय बैठक, कार्यक्रम अथवा निमंत्रणासाठी प्रवास करताना रेल्वे तिकिटांवर ४० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत असे. मात्र, कोविडनंतर ही सुविधा थांबवण्यात आली असून, अद्याप ती पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कार्यसुलभतेसाठी ही सवलत पुन्हा लागू करणे आवश्यक आहे.”
‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या वतीने सादर करण्यात आलेल्या या निवेदनामुळे पत्रकारांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा केंद्र सरकारचे लक्ष वेधले गेले आहे. “पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. शासन आणि जनतेमधील संवादाचा पूल म्हणून ते कार्य करतात. अशा पत्रकारांसाठी सरकारने पूर्वीप्रमाणेच रेल्वे प्रवास सवलत लागू करावी,” अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.

📸 फोटो ओळ:
खासदार अमर शरदराव काळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्रकारांना पुन्हा रेल्वे सवलत लागू करण्याबाबतचे निवेदन नवी दिल्लीत दिले.


