सावंतवाडी : श्रावणसरी अंगावर बरसू लागल्या की, बालकवी त्र्यंबक ठोमरे यांची “श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे” या कवितेची आठवण येते. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. यंदा शुक्रवारी, २५ जुलै २०२५ पासून महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू झाला आहे. तर शनिवारी, २३ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिना संपणार आहे. या महिन्यात चार श्रावणी सोमवार आले आहेत.
किती सोमवार आणि कोणती शिवामूठ वाहावी –
- पहिला श्रावणी सोमवार : २८ जुलै २०२५ पहिल्या सोमवारी शिवामूठ ‘तांदूळ’ वाहावी.
- दुसरा श्रावणी सोमवार : ०४ ऑगस्ट २०२५ दुसऱ्या सोमवारी शिवामूठ ‘तीळ’ वाहावी.
- तिसरा श्रावणी सोमवार : ११ ऑगस्ट २०२५ तिसऱ्या सोमवारी शिवामूठ ‘मूग’ वाहावी.
- चौथा श्रावणी सोमवार : १८ ऑगस्ट २०२५ चौथ्या सोमवारी शिवामूठ ‘जव’ वाहावी.
शिवामूठ करण्याची पद्धत – विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.
‘या’ पद्धतीनं करा महादेवाची पूजा – सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून महादेवाची पूजा करावी. सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावं किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. महादेवाला गंगाजल किंवा दुधानं अभिषेक करावा. यानंतर महादेवाला चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुलं, मध, फळं, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी. तर प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाला शिवामूठ नक्की अर्पण करा.
(टीप – ही माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी ‘सत्यार्थ न्यूज’ सहमत असेलच असं नाही.)


