वैभववाडी : तालुक्यातील सडूरे गावचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार रावराणे यांचा सातवा स्मृतिदिन आज आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या मातोश्री सौ. ज्योती प्रकाशकुमार रावराणे, संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री.सज्जनकाका रावराणे, संस्थेचे विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे व प्रभारी प्राचार्य डॉ.नामदेव गवळी उपस्थित होते.

सुरुवातीला हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालय आणि वैभववाडी तालुक्याच्यावतीने मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृति जागवण्याचा प्रयत्न गेली सात वर्षे सुरू आहे. आजच्या युवकांना मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या जीवन कार्याची ओळख व्हावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे डॉ.नामदेव गवळी यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले. कु.अनिकेत कुलकर्णी याने मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले.
वैभववाडीच्या इतिहासात आणि विकासात रावराणे समाजाचे खुप मोठे योगदान आहे. अनेक व्यक्तींनी आपल्या पराक्रमांनी वैभववाडीचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोचवले आहे. त्यापैकी सडूरे गावचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांनी देशसेवा करतांना वीरमरण पत्करले. ते देशासाठी लढले आणि थोर हुतात्मे झाले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तरुणांनी देशसेवेसाठी पुढे आले पाहिजे हिच त्यांना खरी मानवंदना व आदरांजली ठरेल असे प्रा. एस. एन. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
कौस्तुभ सारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला आणि प्रामाणिकपणे देशसेवा करताना त्याला हौतात्म्य प्राप्त झालं ही दुःखदायक गोष्ट आहे. पण देशसेवा करता करता तो भारतमातेचा वीरपुत्र झाला हे आमचं भाग्य समजते.
त्याच्या स्मृती आमच्या सोबत कायम आहेत.
आपण सर्व वैभववाडीवाशीय त्याच्या स्मृती जागवत आहात याचा आनंद आणि अभिमानही आहे, अशा शब्दात मातोश्री ज्योती रावराणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कौस्तुभ रावराणे यांचे कार्य पुढील पिढीला समजावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे यांनी सांगितले. तसेच या स्मृतिदिनानिमित्त महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये एकूण १२० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक समितीचे सचिव श्री. प्रमोद रावराणे आणि सर्व मित्र परिवार यांनी केले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, वैभववाडी तालुक्यातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी व रावराणे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निलेश कारेकर यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.राहुल भोसले यांनी मांडले.


