वेंगुर्ला : महाराष्ट्रातील नामांकित विद्या विकास एज्युकेशन संस्था, मुंबई संचलित मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी ह्या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेच्या वतीने शालेय विद्यार्थी, पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन आज शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते.

ह्या आरोग्य तपासणी शिबिरात स्त्री रोगतज्ज्ञ,डोळ्यांचे व इतर विकारांचे डॉक्टर, ECG, रक्तगट तपासणी, HB तपासणी,मोफत औषधे इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. शिबिराला सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवून विशेष सहकार्य केले. सदर आरोग्य तपासणी शिबिरास ३०० हुन अधिक जणांनी सहभाग घेतला.
तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग,शाखा-वेंगुर्ला व मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास शालेय शिक्षक, कर्मचारी व रेडी गावातील ग्रामस्थ अश्या सर्वांनी मिळून २५ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन हे शिबीर यशस्वी होण्यास सहकार्य केले.

सदर सामाजिक उपक्रम सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, वेंगुर्ला चे तालुकाध्यक्ष राजाराम चिपकर, सचिव भूषण मांजरेकर, माऊली युवा प्रतिष्ठान रेडी चे सदस्य रोहन सावंत, प्रदीप बागायतकर, दुर्ग रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण तेंडुलकर, ज्ञानेश्वर राणे,संकल्प वाडकर, सर्व शालेय शिक्षक व कर्मचारी वृंद,विद्यार्थी, रक्तदाते व SSPM Lifetime हॉस्पिटल,ब्लडबँक, पडवे चे श्री मनीष यादव, विष्णू गोसावी व इतर सर्व डॉक्टर परिचारिका यांनी सदर शिबीर यशस्वी होण्यास विशेष परिश्रम घेतले, त्या सर्वांचे मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. गीता विल्सन यांनी गुलाब पुष्प देऊन विशेष आभार व्यक्त केले.


