सावंतवाडी : काल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे एका जुगाराच्या अड्ड्यावर जातीनिशी हजर राहून तेथील जुगार चालकांना खडसावत धाड टाकत असल्याचा एक विडिओ सध्या वायरल होत आहे.
ते पाहून आश्चर्यही वाटलं आणि ही काय नौटंकी आहे? असा प्रश्नही मनात आला, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.
अशा पध्दतीने स्वतः जुगार अड्ड्यावर जातीने हजर राहून धाड टाकण्यासाठी जाण्याची पाळी पालकमंत्री महोदयांवर येत आहे म्हणजे पोलीस खात्यावरचा त्यांचा विश्वास उडालेला आहे की काय? जिल्ह्यात सक्षम पोलीस यंत्रणा असताना एका कडक आदेशानुसार जिल्ह्यातील ड्रग्स, जुगार, मटका, वेश्याव्यवसाय असे सगळे अवैध धंदे २४ तासांत बंद होऊ शकतात, मग स्वतः जाऊन आरडाओरडा करण्याची आणि त्याचा विडिओ काढून वायरल करण्याची पाळी पालकमंत्री महोदयांवर का बरं आली असावी?
दोन तीन दिवसांपूर्वी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी लढविलेल्या विशाल परब यांची मोठा गाजावाजा करत भाजप मध्ये घरवापसी झाली. दहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुक प्रचारात दीपक केसरकर यांचा प्रचारसभेत बोलताना विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब ह्याच विशाल परब यांच्याबद्दल जनतेला सांगत होते की अवैध ड्रग्स व्यवहार आणि लॅंड माफिया कोण आहे ते ओळखा..?, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनी कोणी बळकावल्या आणि परप्रांतीय धनाढ्य लॅंड माफियांना विकून कोट्यवधी रूपये कोणी व कसे कमावले आहेत ते बघा. मग आता प्रश्न असा मनात येतो की “पार्टी विथ अ डिफरन्स” हे बिरूद मिरवणाऱ्या पक्षाला असे नेते/कार्यकर्ते चालतात का? हा खरंतर सामान्य जनतेत सध्या चर्चेचा विषय आहे, असा सवालही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.


