कणकवली : पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल जाधव यांचे निलंबन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणेंनी कणकवलीतील मटका अड्ड्यावर काल छापा टाकल्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
कणकवली शहरात अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी काल पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला. शहरातील घेवारी यांच्या मटका अड्ड्यावर त्यांनी अचानक धाड टाकत बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर पाऊल उचलले. या धाडीनंतर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली.
या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी स्पष्ट इशारा दिला की, जिल्ह्यातील अवैध धंद्यांना कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय पाठबळ मिळणार नाही. जे अधिकारी अशा धंद्यांना संरक्षण देतील त्यांची गय केली जाणार नाही. त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना व इतर यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला. त्यानंतर सायंकाळी उशिरा पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे निलंबन करण्यात आले आहे.


