आंबोली : येथील ग्राम पंचायत सार्वजनिक रस्ता कुंपण करून गणेश विसर्जनाचा मार्ग बंद केलेबाबत मुळवंतवाडी (गुरववाडी) येथील नागरिकांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसरकरांना निवेदन सादर करीत रस्ता मोकळा करण्यासाठी विनंती केली आहे.

याबाबत आपल्या निवेदनात मुळवंतवाडी (गुरववाडी) येथील नागरिक म्हणतात – आमच्या आंबोली मुळवंतवाडी (गुरववाडी) येथे ग्रामपंचायतचा सार्वजनिक रस्ता आहे. सदर रस्ता दीड कि.मी.चा असून ग्रामपंचायत नमुना 26 मध्ये नोंद आहे. सदर रस्त्यावर गणपत सोमा गावडे व मालती गणपत गावडे यांनी कुंपण करून रस्ता अडवलेला आहे. त्यांनी केलेल्या कुंपणामुळे आम्हाला आमच्या शेतात जाणे – येणे, गणेश विसर्जन तसेच इतर वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. आम्हाला अन्य दुसरा कोणताही मार्ग नाही. सदरचा रस्ता हा वाडीच्या अस्तित्वापासून वहिवाटीत असून आंबोली ग्रामपंचायत ने 1982 पासून रस्त्याच्या देखभालीसाठी, खडीकरण आणि डांबरीकरणासाठी खर्च केलेला आहे. श्री. गणपत सोमा गावडे यांनी मुद्दाम आमची अडवणूक केलेली आहे. ग्रामपंचायतने केलेले खडीकरण व डांबरीकरण उखडून टाकून त्याने त्या ठिकाणी मुद्दाम शेती केलेली आहे. त्यामुळे वाडीतील सर्व आजी-माजी सैनिक व ग्रामस्थांची अडवणूक होत आहे. रस्ता खुला करण्याबाबत आम्ही ग्रामपंचायत ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वेळोवेळी विनंती केलेली आहे. तसेच 26 जानेवारी 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय आंबोली येथे उपोषणही केलेले होते; परंतु कोणत्याही स्तरावरून आमच्या समस्येची दखल घेण्यात आलेली नाही. रस्ता अडवणुकीमुळे वाडीत वादविवाद होत असून गणपत सोमा गावडे हा आपल्या बायकोला मालती गणपत गावडे हिला पुढे करून आमच्या तरुण मुलांवर खोटे गुन्हे दाखल करून वाढीची शांतता भंग करत आहे. त्यामुळे वाडीत भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. गावातील 60 कुटुंबांचा येत्या गणेशोत्सवात सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जनाचा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे.
आम्ही आपणास विनंती करतो की कृपया आपण ग्रामपंचायत सदरील नोंद असलेला रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा. तसेच आपणाकडून गणेश विसर्जनावेळी पोलीस बंदोबस्त मिळावा ही विनंती.
दरम्यान मुळवंतवाडी (गुरववाडी) येथील नागरिकांनी आपल्या सदर निवेदनाची प्रत तहसीलदार, सावंतवाडी., गटविकास अधिकारी, सावंतवाडी., पोलीस निरीक्षक, सावंतवाडी., ग्रामविकास अधिकारी, आंबोली., आंबोली पोलीस स्टेशन यांनाही सादर केली आहे.


