- रूपेश पाटील
- सावंतवाडी : ‘सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय’ अर्थात एक प्रकारे ‘रेफर केंद्र’ आहे, हे अनेकदा निदर्शनास आले आहे. अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची अनेकदा खराब हालत होत असते. या उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका वारंवार येथील रुग्णांना सतत बसत आहे. शहरात रुग्णवाहिका उपलब्ध असूनही केवळ चालक नसल्याने कुटुंबीयांची ऐनवेळी प्रचंड धावपळ होते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सुविधांची वानवा असल्याने अनेक रुग्णांना पुढील उपचारांसाठी गोवा-बांबोळी किंवा ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. मात्र, येथील बहुतांश रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील असल्याने त्यांना खाजगी वाहनाने किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नसते. असे असतानाही, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांना धडपड करावी लागते.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी एका वृद्ध महिलेला घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेची नितांत गरज होती. कुटुंबीयांनी शहरात चौकशी केली असता, रुग्णवाहिका उपलब्ध आहेत पण चालक नसल्याचे उत्तर मिळाले. आयत्यावेळी झालेल्या या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची चिंता वाढली आणि त्यांची धावपळ सुरू झाली. निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी रुग्णालयाला रुग्णवाहिका देतात, मात्र त्या ऐनवेळी अशाप्रकारे निरुपयोगी ठरत असल्याचा अनुभव अनेकदा येतो.
ह्याचवेळी माडखोल येथील सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, भाजप नेते विशाल परब यांनी माडखोल परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी दिलेल्या मोफत रुग्णवाहिकेसाठी फोन केला. श्री. राऊळ यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि पुढील केवळ वीस मिनिटांत रुग्णवाहिका रुग्णालयात हजर केली. या रुग्णवाहिकेने त्या वृद्ध महिलेला सुखरूप घरी पोहोचवण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र शहरात रुग्णवाहिका असूनही केवळ चालकाअभावी रुग्णांना वेठीस धरले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐन गरजेच्या वेळी सरकारी यंत्रणा अपयशी ठरत असताना, विशाल परब यांनी दिलेली रुग्णवाहिकाच रुग्णाच्या कामी आल्याने, “अखेर भाजप नेते विशाल परब यांनी दिलेली अॅम्बुलन्स कामी आली,” अशी चर्चा परिसरात सुरू होती.


