मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यभरात प्रवाशांची कोंडी होताना दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका गणेशोत्सवासाठी कोकणातील आपापल्या गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या चाकरमान्यांना बसण्याची शक्यता आहे. कोकणातील दापोली, खेड या एसटी आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी एसटी संपाला उत्स्फुर्त पाठिंबा दिला होता. याचा परिणाम कोकणातील एसटी सेवेवर दिसून येत आहे. मुंबई सेंट्रल आगारातून कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर याचा प्रभाव जाणवत आहे. रात्री बाहेरील डेपोतून गाड्या मुंबई सेन्ट्रलमध्ये येणं अपेक्षित होते. मात्र, या एसटी बसेस आगारात न आल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कोकणात नियोजित असलेल्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागू शकतात. तसे झाल्यास गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आपल्या गावी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे.
जिच्या भरवशावर गणेशोत्सवासाठी गावाला जायचं नियोजन केलं होतं त्याच एसटीनं दगा दिल्याने गाव गाठायचे कसे, असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. मुंबई सेन्ट्रलमध्ये कोकणात जाणाऱ्या आणि आरक्षण केलेल्या प्रवाशांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला वेढा घातला आहे. काही अंशी गाड्या सुरु आहेत त्या गर्दी होत असलेल्या मार्गावरच सोडल्या जात आहेत. दुसरीकडे, प्रवाशांकडून कोकणात जाणाऱ्या गाड्या संदर्भात विचारणा केली जातेय. मात्र, चालक-वाहक उपलब्ध नसल्यानं गाड्या सुटत नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे देवाक काळजी रं म्हणणाऱ्या प्रवाशांनी आता पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.
एसटी महामंडळाच्या गणपती विशेष गाड्यांमध्ये ४२०० गट आरक्षण आणि ७०० पेक्षा अधिक वैयक्तिक आरक्षणाचा सहभाग आहे. सर्वाधिक गाड्या ४,५ आणि ६ सप्टेंबर रोजी सुटणार असल्याने आंदोलन सुरु राहिल्यास प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज अनेक प्रवाशांची तिकीटे आरक्षित आहेत. मात्र, सध्या मुंबई सेंट्रल एसटी आगारात बसेस नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक प्रवासी तासभरापेक्षा अधिक काळ डेपोत थांबून आहेत.
जादा गाड्यांची संख्या किती?
आज
मुंबई – 337
ठाणे – 472
पालघर – 187
उद्या
मुंबई – 1365
ठाणे – 1881
पालघर – 372


