Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

जनतेला न्याय देण्याची संधी मिळाली आहे, जबाबदारी पूर्ण करा! : पालकमंत्री नितेश राणे. ; सेवा पंधरवड्याचा शानदार शुभारंभ!, ८९ आरोग्य सेविकांना नेमणूक प्रमाणपत्र.

  • प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत चावी वाटप.

सिंधुदुर्गनगरी : आपण जनतेचे सेवक आहोत. जनतेला न्याय देणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. प्रशासनात काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लोकहितासाठी मार्ग काढण्याची मानसिकता आवश्यक आहे. जनतेला न्याय देण्याची संधी मिळाली असून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.


पालकमंत्री राणे म्हणाले की, सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना पात्र नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलता आणि जबाबदारीने काम करावे.
सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ( १७ सप्टेंबर २०२५)ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर २०२५) या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्याचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे , मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर , जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, पीएम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

      
पालकमंत्री श्री राणे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या पंधरवड्याच्या आयोजन करण्यात आलेले आहे. हा सेवा पंधरवडा राबविण्यामागचा हेतू आपण समजून घेणे आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान मोदीजींचा प्रवास सर्वासाठी प्रेरणादायी आहे. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी देशाची प्रगती केलेली आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण देशाला महाशक्ती कसे बनवता येईल यासाठी त्यांनी दिलेला आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्यांनी शक्य करून दाखविल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे आज भारतीयांची मान जगात गर्वाने उंचावलेली आहे. मोदीजींनी आपल्या कार्यप्रणालीतून असंख्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेले आहेत. अनेक देश कोविड नंतर अजूनही सावरले नाहीत परंतु मोदीजींच्या दूरदर्शी नियोजनामुळे आपल्या देश कोविड नंतरही आत्मनिर्भर पणे उभा आहे.

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने आपण 89 आरोग्य सेविकांना नेमणूक प्रमाणपत्र दिले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना चावीचे वितरण केले तसेच विद्यार्थ्यांना जातीचे, राष्ट्रीयत्वाचे तसेच अधिवासाचे दाखले दिले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद हीच आपल्या कार्याची पावती आहे. म्हणून मी म्हणतो जनतेचे काम करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. अधिकाऱ्याची इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. आपण आपल्या पदाचा वापर करताना जनतेला न्याय देता येईल हे नेहमी लक्षात घेतले पाहिजे. जनतेचा एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही अशी भावना सर्वांच्या मनात पाहिजे तरच जनतेचे प्रश्न सोडू शकतील असेही ते म्हणाले.

प्रशासनात काम करताना झिरो पेंडन्सीला प्राधान्य द्या, वेळेत निर्णय घ्या आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवा. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाला सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येणार आहे. पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात आपल्या जिल्ह्याला विकसित जिल्हा बनवायचा आहे. प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न कसे वाढेल यासाठी मी सतत प्रयत्नशील असणार आहे आणि प्रशासन म्हणून तुम्हीही याबाबतीचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. प्रशासनात काम करत असताना जनतेच्या आयुष्यात बदल कसा होऊ शकतो हे सातत्याने सर्वांनी विचार करणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.


जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यावेळी म्हणाल्या की या पंधरवड्याच्या निमित्ताने सामान्य जनतेसाठी असणाऱ्या सेवा अधिक गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. पंधरवड्या दरम्यान विद्यार्थ्यांना अधिकाधिक दाखले, प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. शाळा तिथे दाखले हा नाविन्यपूर्ण उपक्रम या पंधरवड्यात राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याचा हा अनोखा प्रयोग केला जाणार आहे. तसेच या कालावधीमध्ये शासकीय योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचाही जिल्हा प्रशासनाचा उद्देश असल्याचा जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या.

प्रस्ताविकामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खेबुडकर यांनी सेवा पंधरवडा विषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले या पंधरवड्याच्या निमित्ताने शासनाने जनतेसाठी राबविलेल्या विविध योजना उपक्रम याची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. विशेष म्हणजे महिला आरोग्य सेविकांचा प्रश्न जिल्ह्यात महत्त्वाचा बनला होता, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न सकारात्मकपणे सोडवण्यात आलेला आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमांमध्ये 89 आरोग्य सेविकांना नेमणूक प्रमाणपत्र, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधणी पूर्ण झाल्याने चावीचे वितरण तसेच ग्रामीण जीवननोन्नती अभियान अंतर्गत जागृती महिला बचत गटाला प्राथमिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी तर आभार तहसीलदार चैताली सावंत यांनी मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles