- वेंगुर्ला येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा “सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय” पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भेट घेऊन केला सत्कार!
वेंगुर्ले : येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्तम ग्रामीण विद्यालय पुरस्कार प्राप्त होणे ही केवळ वेंगुर्ले वासियांसाठीच नव्हे तर पूर्ण कोकणसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी बजावणाऱ्या या महाविद्यालयाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करताना आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे. भविष्यात हीच परंपरा कायम राखताना आम्ही सर्वजण महाविद्यालयाच्या पाठीशी राहून आपली अशीच अभिमानास्पद ओळख जगाच्या नकाशावर न्यावी, यासाठी सर्वतोपरी सहकार्याचा हात देऊ, असे अभिवचन यावेळी भाजपा युवा नेते विशाल परब यांनी दिले. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या स्टाफची भेट घेऊन त्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

१५ सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. १९६१ मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसोबतच येथे एनसीसी आणि एनएसएस यांसारख्या उपक्रमांवर विशेष भर दिला गेला.एनसीसी युनिटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तर एनएसएस विभागातून सामाजिक जाण यशस्वीपणे रुजवली जाते. संस्थेच्या सामाजिक योगदानाचा प्रखर पुरावा आहे. गेल्या दशकात एनएसएस स्वयंसेवकांनी ग्रामीण स्वच्छता मोहिमा, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण, गाव विकास योजना, महिला सबलीकरण कार्यशाळा, डिजिटल व्यवहारांचे प्रशिक्षण अशा अनेक उपक्रमांत सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, वेंगुर्ले नगरपालिकेसोबत राबविलेल्या स्वच्छता मोहिमा तसेच वेटलैंड दस्तऐवजीकरण प्रकल्प यामध्ये एनएसएस विद्यार्थ्यांची उपस्थिती ठळक राहिली. ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनासाठी या स्वयंसेवकांनी केलेले प्रयत्न विद्यापीठानेही गौरवले आहेत. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या स्वच्छता मोहिमा आणि सामाजिक उपक्रमांची विद्यापीठाने दखल घेत सर्वोत्तम महाविद्यालयाचा पुरस्कार खर्डेकर महाविद्यालयाला प्रदान केला आहे. या महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापकवृंद व सहयोगी कर्मचारी यांच्या सत्कारप्रसंगी भाजपा युवा नेते विशाल परब, ज्येष्ठ नेते ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, पर्यवेक्षक डी.जे. शितोळे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. विवेक चव्हाण, कार्यालय अधीक्षक संभाजी पाटील, आयक्यूओसी समन्वयक एस. एच. माने, जिमखाना चेअरमन वीरेंद्र देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.


