चंदगड : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आज चंदगड येथे नऊवारी साडी शिवण्याच्या प्रशिक्षण वर्गाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या प्रशिक्षणातून स्थानिक महिलांना घरबसल्या उत्पन्नाचे साधन मिळणार असून, त्यांना व्यावसायिक आत्मनिर्भरतेचा मार्ग मोकळा होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी चंदगडमधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. समाजसेविका भरती जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी रत्नमाला वाडेकर, प्राथमिक शिक्षिका स्नेहल कुरणे, डॉक्टर सौ. देसाई, सौंदर्य व्यवसायिक साळुंखे मॅडम आणि कोकण संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. मनस्विनी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भरती जाधव यांनी महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी अशा प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. “छोट्या उद्योगातून महिलांना केवळ आर्थिक स्वातंत्र्यच नव्हे, तर सामाजिक आत्मभानही मिळते,” असे त्या म्हणाल्या.
रत्नमाला वाडेकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि महिलांनी कृषीपूरक व्यवसायातही पुढाकार घ्यावा, असे सांगितले. साळुंखे मॅडम यांनी स्वतःचा व्यवसाय कसा उभा करावा यावर सखोल मार्गदर्शन करत महिलांना आवश्यक त्या वेळी मदतीचे आश्वासन दिले.
डॉ. सौ. देसाई यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, “प्रशिक्षणासाठी आम्ही जागा कमी भाडे तत्वावर उपलब्ध करून दिली आहे. कोकण संस्था ज्या सातत्याने महिलांसाठी उपक्रम राबवत आहे, ते निश्चितच समाजहिताचे कार्य आहे.”
संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. मनस्विनी कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले. त्यांनी संस्थेच्या इतर उपक्रमांची माहितीही दिली.
या प्रशिक्षणातून चंदगडमधील महिलांना पारंपरिक कौशल्याचा आधुनिक बाजारपेठेत उपयोग करून रोजगार निर्माण करता येणार आहे. स्थानिक बाजारात तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही साड्या विकण्याची संधी तयार होईल. भविष्यात महिलांनी स्वतःचे बुटीक किंवा घरगुती उद्योग सुरू करून इतर महिलांनाही रोजगार देण्याचा मार्ग या प्रशिक्षणामुळे खुला होणार आहे.


