- अक्षय धुरी.
- सावंतवाडी : न्हावेली येथे येत्या रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी श्री दुर्गामाता दौड या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग न्हावेली यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडणार आहे.
ही दौड संध्याकाळी ३ वाजता पार्सेकर वाडी येथून सुरुवात करणार असून, परिसरातील गावकरी, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहेत. भगव्या पताकांचा समुद्र, पारंपरिक वेशभूषेतले युवक, ढोल-ताशांचा निनाद आणि “जय दुर्गामाता, जय शिवराय”च्या घोषणांनी न्हावेली परिसर दुमदुमून जाईल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
दुर्गामाता दौडीचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील सर्व स्तरातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग. या माध्यमातून हिंदू समाजात संस्कार, शौर्य, राष्ट्रीयता आणि ऐक्याचा संदेश दिला जाणार असल्याचे आयोजक मंडळाने स्पष्ट केले. यासाठी स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने तयारी करत आहेत.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


