- अक्षय धुरी.
सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्या वतीने प्रथमच आयोजित केलेल्या मळगाव येथील श्री दुर्गामाता दौडला मळगाव येथील हिंदूप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दौडीत सर्वजण पारंपारिक वेशभूषेत तर विद्यार्थी शालेय वेशभूषेत सहभागी झाले होते.
सकाळी ८ वाजता येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या श्री दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. दौडची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून व भगव्या ध्वजाचे पूजन व ध्वजास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिषेक रेगे यांनी यावेळी सांगितले की, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पोटात असताना नवरात्री सणात अखंड नऊ दिवस तुळजाभवानीचा जागर करून जगदंबेच्या चरणी देशासाठी, हिंदू धर्मासाठी मागितलेले वरदान, मागितलेले आशीर्वाद हे पुनररुपी मागण्याची प्रथा म्हणजेच दुर्गामाता दौड असल्याचे सांगितले.
या दौडीत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय,जय भवानी, जय शिवराय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय आदी घोषणा देत मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रस्तावाडी, सुतारवाडी, पिंपळवाडी, नाईकवाडी आदी वाड्या घेत श्री देव मायापूर्वचारी मंदिरपर्यंत दौड काढण्यात आली. मंदिरात पोहोचल्यावर सर्वप्रथम सर्वांनी मायापूर्वचारी देवाचे व श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले. त्यानंतर भगव्या ध्वजाला नमस्कार केला. त्यानंतर गणपती, शंकर, दुर्गा देवीची व भारत मातेची आरती करून दौडीची सांगता करण्यात आली. या दौडीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिषेक रेगे, सुमित नलावडे, शुभम घावरे, आकाश खिल्लारे, संपदा राणे तसेच सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थानचे दुर्गसेवक सुनील राऊळ, एकनाथ गुरव, प्रताप परब, शुभम नाईक, गजानन दळवी तसेच प्रकाश राऊळ, सहदेव राऊळ, रितेश राऊळ, ज्ञानेश्वर राणे, समिधा राऊळ, प्रगती राऊळ, हिंदू बंधू भगिनी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


