सावंतवाडी : सावंतवाडी येथील रासाई युवक कला क्रीडा मंडळाच्या नवरात्रौत्सवात यावर्षी कला आणि भक्तीचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. या उत्सवात मालवण येथील श्री स्वामी समर्थ डान्स ग्रुपने आपला नृत्यविष्कार सादर केला, ज्यात एक अद्भुत कलाप्रकार रसिकांना अनुभवता आला.
या कार्यक्रमादरम्यान, समर्थ मेस्त्री या युवा चित्रकाराने उपस्थितांना थक्क करून सोडले. त्याने चक्क आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून अवघ्या काही मिनिटांत छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अप्रतिम चित्र रसिकांसमोर रेखाटले.
समर्थ मेस्त्री यांनी दाखवलेल्या या असामान्य कौशल्याने प्रेक्षकवर्ग अचंबित झाला. त्यांच्या या कलेला आणि पराक्रमाला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. समर्थ मेस्त्री यांच्या या नेत्रदीपक कलाविष्काराने नवरात्रौत्सवातील कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.


