दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील अमली पदार्थविरोधी मोहीम अधिक तीव्र करत ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत दापोली व मंडणगड तालुक्यांत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २ कोटी २२ लाख ९२ हजार ४०० रुपये किमतीचा चरस सदृश्य अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक फरार आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. व्ही. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणी अमली पदार्थविरोधी कारवायांसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. याच मोहिमेअंतर्गत दि. १५ सप्टेंबर रोजी दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश तोरसकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केळशी किनारा मोहल्ल्यात छापा टाकण्यात आला.
या कारवाईत अनार इस्माईल डायली (३२) याच्या घराच्या पडवीतून ‘6-Gold’ च्या वेष्टनात ठेवलेला ०.९९८ किलो चरस (किंमत अंदाजे २४ लाख रुपये) जप्त करण्यात आला. त्याच्या चौकशीतून अकिल अब्बास होडेकर (४९) याचे नाव पुढे आले. त्याने उर्वरित ४ चरसच्या पिशव्या साखरी समुद्रकिनाऱ्यावरील झुडपात लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या पिशव्या हस्तगत करून ४.७३१ किलो चरस (किंमत सुमारे २ कोटी १८ लाख ९२ हजार रुपये) जप्त केला.
एकूण कारवाईत पोलिसांनी ५.७२९ किलो वजनाचा चरस जप्त केला असून, याची एकूण बाजारमूल्ये २ कोटी २२ लाख ९२ हजार ४०० रुपये इतकी आहे.
या प्रकरणात तिसरा आरोपी तावीस महमूद डायली (३०) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, ठाणे येथील शिळ डायघर पोलीस ठाण्यात दाखल (गु.र.नं. ८६७/२०२५) एन.डी.पी.एस. गुन्ह्यातील आरोपी ममुद बदुद्दीन ऐनटकर (२९) याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्याचा लवकरच रत्नागिरी पोलिसांकडून ताबा घेण्यात येणार असून, त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, उपनिरीक्षक श्री. यादव व श्री. पाटील, पोलीस कर्मचारी गायकवाड, मोहिते, ढोले, भांडे, टेमकट, दिडे व पाटेकर यांनी सहभाग घेत यशस्वी कारवाई केली. पुढील तपास सुरू असून, आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


