कानपूर : इंडिया ए टीमने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात रंगतदार झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया ए संघावर 2 विकेट्सने मात केली आहे. टीम इंडियाने यासह 3 मॅचची अनऑफीशियल वनडे सीरिज 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 318 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 2 विकेट्स राखून आणि 24 चेंडूंआधी पूर्ण केलं. भारताने 46 ओव्हरमध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 322 धावा केल्या. प्रभसिमरन सिंग हा टीम इंडियाच्या विजयाच्या हिरो ठरला. तर कॅप्टन श्रेयस अय्यर आणि रियान पराग या दोघांनीही अर्धशतकं करत निर्णायक भूमिका बजावली. तर इतरांनीही योगदान दिलं.


