पंचकुला : पंजाबचे माजी पोलीस महासंचालक (DGP) मोहम्मद मुस्तफा यांच्यावर त्यांचा मुलगा अकील अख्तरच्या हत्येचा आणि गुन्हेगारी कट रचल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच त्यांची पत्नी, मुलगी आणि सूनेविरोधातही खळबळजनक आरोप असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा हरयाणातील पंचकुला इथल्या घरात अकीलचा संशस्यास्पद मृत्यू झाला होता. औषधांच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली होती. परंत शेजारी राहणाऱ्या शमशुद्दीनने अकीलच्या पत्नी आणि वडिलांवर गंभीर आरोप केले. अकीलच्या पत्नीचं सासऱ्यांसोबत अनैतिक संबंध असल्याचं त्याने म्हटलंय. याच संबंधांतून अकीलची हत्या केल्याचा आरोप आहे. या कटात अकीलची आई रजिया सुल्तानसुद्धा सामील असल्याचं त्याने म्हटलं आहे.
मुलाचा संशयास्पद मृत्यू –
शमशुद्दीनने पंचकुलाच्या पोलीस आयुक्तांकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर पंचकुला एमडीसी पोलीस ठाण्यात मोहम्मद मुस्तफा, त्यांची पत्नी आणि पंजाबच्या माजी मंत्री रजिया सुल्तान, सून आणि मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 35 वर्षीय अकील हा पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात प्रॅक्टिस करत होता. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मृत्यूनंतर 27 ऑगस्ट रोजी अकीलचा एक व्हिडीओ समोर आला. कुटुंबातील काही लोक मला मारण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्याने या व्हिडीओत केला होता. त्यात त्याने पत्नी आणि त्याच्या वडिलांच्या अफेअरचाही उल्लेख केला होता.
कोण आहेत मोहम्मद मुस्तफा?
16 ऑक्टोबर रोजी अकील त्याच्या पंचकुला इथल्या घरात बेशुद्धावस्थेत आढळला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता पोलिसांनी त्याला मृत घोषित केलं. पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा हे उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील हरडा गावात राहणारे आहेत. ते 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना पाच शौर्य पुरस्कार मिळाले आहेत. 2021 मध्ये ते डीजीपी म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात ते सक्रिय आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. मुस्तफा यांच्या पत्नी रजिया सुलतान या काँग्रेसच्या चरणजित सिंग चन्नी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या. 2022 मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. परंतु निवडणुकीत त्या पराभूत झाल्या होत्या. तर मुस्तफा यांची सून झैनब अख्तरची चार वर्षांपूर्वी पंजाब वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.


