सावंतवाडी : कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. लाखो भाविक कोकणात आपल्या लाडक्या बाप्पाला पुजण्यासाठी येत असतात. काही गणेश भक्तांचा बाप्पा दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस, अकरा दिवसांपर्यंतही मुक्कामी असतो. तळकोकणातील सावंतवाडी येथे आज पाचव्या दिवशी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. ‘बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन आम्हा पडेना’, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढील वर्षी लवकर या.!’, असा जोरदार गजर करत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप दिला. यावेळी अनेक बाल गणेशभक्तांचे डोळे पाणावले. सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात अनेक गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाचे आज पाचव्या दिवशी विसर्जन केले. बाप्पाच्या विसर्जना वेळी अनेकांना आपल्या डोळ्यातील अश्रू लपवता आले नाहीत. हे देखील आज गणेश भक्तांची भक्ती काय असते ते सांगून गेले.



