Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

ऐन दिवाळीत वारंवार वीज गायब, महावितरणचा भोंगळ कारभार उघड! ; महिलांकडून मेणबत्ती मोर्चाचा इशारा!

सावंतवाडी : गणेशोत्सवानंतर दीपावलीमध्येही वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दिव्यांचा सण अंधारोत्सव म्हणून साजरा करण्याची पाळी सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांवर आली. सलग दोन दिवस वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे दिव्यांची रोषणाई उजळली नाही. ही परिस्थिती सातार्डा पंचक्रोशीसह मळगाव आणि सावंतवाडी तालुक्यातील सर्वाधिक भागांमध्ये गेल्या दोन दिवसांत होती. काही भागांमध्ये अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दिव्यांचा सण म्हणून दीपावली साजरी होत असताना सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा गाव मात्र दोन दिवस अंधारात होता. अगदी सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली.

वीज महावितरण कंपनीकडून सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडित होतो, याचीच पुनरावृत्ती झाली. सोमवार, २० ऑक्टोबरला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी साडेआठ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी दुपारी सुरू झाला. मात्र, मंगळवार, २१ ऑक्टोबरला पुन्हा सायंकाळी ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सात वाजताच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा रात्री दहा वाजताच्या सुमारास सुरळीत झाला.

तक्रार करायची कुणाकडे? सावंतवाडी तालुक्यातील चौदा गाव वेंगुर्ला वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाशी जोडण्यात आलेले आहेत.यामध्ये सातार्डा,आरोंदा,मळेवाड,आजगांव,कोंडूरे,तळवणे,कवठणी,किनळे आदी गावांचा यात समावेश आहे, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर अधिकाऱ्यांना कॉल केल्यानंतर ते कॉल घेत नाहीत. महावितरण कंपनीने दिलेले मोबाईल नंबर स्विच ऑफ करून ठेवतात, अशा तक्रारी सातत्याने येत आहेत. याकडे लक्ष कोण देणार, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.त्यामुळे तक्रार कुणाकडे करायची, असा सवाल वीज ग्राहक करत आहेत.

कार्यालय बदलाची मागणी दुर्लक्षित सावंतवाडी तालुक्यातील १४ गावांना सावंतवाडी उप अभियंता कार्यालयाला जोडण्यात यावे, अशी मागणी यापूर्वी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली होती. या मागणीचा पाठपुरावा आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आला होता, मात्र अद्यापही हे गाव वेंगुर्ला वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाशी जोडण्यात आलेले आहेत, ज्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय वाढत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

वीज खंडित होण्यामुळे संतप्त; सातार्डा पंचक्रोशीत ‘मेणबत्ती मोर्चा’चा इशारा!

सातार्डा पंचक्रोशीमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या वीज ग्राहकांच्या वतीने आता महावितरण कंपनीच्या विरोधात ‘मेणबत्ती मोर्चा’ काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सातार्डा ग्रामपंचायत माजी सरपंच उदय पारिपत्ते यांनी हा इशारा दिला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ महिलांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

वेंगुर्ला वीज महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये वीज समस्यांकडे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप उदय पारिपत्ते यांनी केला आहे. पारिपत्ते यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून काही अधिकारी एकाच पदावर आणि एकाच खुर्चीवर बसून असल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे.

त्यामुळे हे अधिकारी वीज ग्राहकांचे कॉल घेत नाहीत आणि त्यांच्या तक्रारींकडेही लक्ष देत नाहीत. सणासुदीच्या काळातही वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ महिलांच्या सहभागाने ‘मेणबत्ती मोर्चा’ काढण्याचा इशारा पारिपत्ते यांनी दिला आहे.या इशाऱ्यामुळे वेंगुर्ला महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले जाईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles