कल्याण : सोन्याच्या किंमती दिवसेंदिवस उच्चांक गाठत असताना, कल्याण पूर्वेत एक अनोखी घटना घडली आहे. एका महिलेकडून चुकून कचऱ्यासोबत सोन्याचा हार फेकला गेला. मात्र केडीएमसीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता तो सोन्याचा हार संबंधित महिलेला परत मिळवून दिला. त्यांच्या या प्रामाणिकतेचे संपूर्ण परिसरात आणि सामाजिक माध्यमांवरही मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
नेमके घडले काय?
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून रोजप्रमाणेच बुधवारी सकाळी कल्याण पूर्वेतील इमारती आणि चाळी परिसरातील कचरा संकलनाचे काम सुरू होते. या दरम्यान एका महिलेकडून नजरचुकीने सोन्याचा महागडा हार कचऱ्याच्या पिशवीत टाकला गेला. काही वेळातच तिला चूक लक्षात आली आणि तिने लगेचच संबंधित 4 ‘जे’ प्रभागाचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव यांच्याकडे तक्रार नोंदवली.
अमित भालेराव यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकारी समीर खाडे यांना दिली. त्यांनी तत्काळ या परिसरातून कचरा गोळा करणाऱ्या गाडीला थांबवून ती कचरा गाडी थेट कचोरे टेकडीवरील इंटरकटिंग केंद्रावर पाठवण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर सोन्याचा हार हरवलेल्या महिलेलाही त्या ठिकाणी बोलावण्यात आले.
सोन्याचा हार परत मिळाला –
इंटरकटिंग पॉईंटवर गाडी पोहोचल्यावर त्या गाडीतील सर्व कचरा महिलेसह तिच्या कुटुंबीयांच्या, शेजाऱ्यांच्या आणि केडीएमसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नीट तपासण्यात आला. काही वेळाच्या शोधानंतर, त्या कचऱ्यातून सोन्याचा हार अखेर सापडला. सफाई कर्मचाऱ्यांनी तो हार सुरक्षितपणे महिलेला परत दिला.
महागडा दागिना सापडूनही त्याला हात न लावता तो मालकिणीला परत देण्याच्या केडीएमसी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कर्मचाऱ्यांनी केवळ एक सोन्याचा हार नाही, तर माणुसकीचे आणि प्रामाणिकतेचे मौल्यवान उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.त्या महिलेलाही आपला सोन्याचा हार परत मिळाल्याने प्रचंड दिलासा मिळाला असून तिच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या घटनेमुळे केडीएमसी सफाई कर्मचाऱ्यांप्रती नागरिकांचा आदर आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे.


