देवगड : अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे सागरी किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने तीन नंबरचा धोक्याचा बावटा जारी केला असून, सध्या ५० ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण आणि देवगड बंदरात स्थानिक तसेच गुजरातमधील एक शेकडो नौका आश्रयाला धावल्या आहेत.
हवामान विभागाने २८ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असा इशारा दिला आहे. वादळसदृश वातावरणामुळे समुद्रात ताशी ४५ ते ५० किलोमीटर वेगाने किंवा त्याहून जास्त प्रमाणात वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी आपली नौका कोळंब खाडी आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत.
सध्या बंदर विभागाकडून मालवण व देवगड किनाऱ्यावर तीन नंबरचा बावटा फडकविण्यात आला असून, सर्व जलपर्यटन आणि मासेमारी क्रियाकलाप तात्पुरते थांबविण्यात आले आहे. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या नौकाही थांबविण्यात आल्या आहेत.
अलीकडे मच्छिमारांना बांगडा, तोवर, पेडवे आणि गेजर या प्रकारच्या मासळी मोठ्या प्रमाणात मिळत होती. मात्र, हवामानातील अस्थिरतेमुळे मच्छिमारी ठप्प झाल्याने बाजारात मासळीच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे.
पर्यटन व्यवसायाला फटका –
दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मालवणात पर्यटकांची मोठी गर्दी असून, समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे सागरी पर्यटन पूर्णपणे ठप्प झाले आहे. जलपर्यटनासह स्कुबा डायव्हिंग, बोट सफरी यांसारख्या क्रियाकलापांवर बंदी आल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिकांवर आर्थिक फटका बसला आहे. मालवण बंदर विभागाकडून नागरिकांना आणि मच्छिमारांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थिती सामान्य होईपर्यंत समुद्रात प्रवेश न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


