सावंतवाडी : “होय, आमचा उमेदवार हा सुशिक्षित, सुसंस्कृत सर्व सामान्य घरातील मराठी – मालवणी भाषा अवगत असलेली, गोर-गरीबांच्या समस्या जाणणारी तसेच रात्री – अपरात्री २४ तास जनतेसाठी उपलब्ध असणारी असेल. लवकरच आम्ही नगराध्यक्षपदाचा चेहरा जाहीर करू, उमेदवाराला आमचे सावंतवाडी नगर परिषदेसाठी २० ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा चेहराही तयार आहे. आम्हाला महायुतीची गरज नाही,” असा ठाम दावा शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत केला.
श्री. परब पुढे म्हणाले, “शहरात आमदार दीपक केसरकर यांनी साडेसहा कोटी रुपयांचा निधी आणून अनेक विकासकामांना गती दिली आहे. केसरकर स्वतः या बाबतीत जास्त बोलत नाहीत, परंतु जनतेपर्यंत हे पोहोचणे गरजेचे आहे म्हणून आम्ही बोलतो.”
यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीता सावंत- कवटकर, शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, अजय गोंदवळे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, “काही लोक शहराच्या विकासावर बोलतात, पण सावंतवाडीचा सर्वांगीण विकास फक्त दीपक केसरकरच करू शकतात. ते या शहराचे ‘विकासाचे रत्न’ आहेत.”मनोज नाईक यांच्याबाबत विचारले असता परब म्हणाले, “मनोज नाईक माझे जिगरी मित्र आहेत. ते काय बोलतात हे मला माहिती नाही; पण आमच्यातील मैत्री कायम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


