दोडामार्ग : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यातील माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष, सुसंस्कृत, सुशिक्षित व मितभाषी व्यक्तिमत्व असलेले रवीकिरण गवस हे इच्छुक असून त्यांना स्थानिक स्तरावर जनतेतून मोठा पाठिंबा मिळत आहे.
माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात “स्थानिक उमेदवार असावा, बाहेरचा नकोच!” अशी जोरदार मागणी होत असून, खोक्रल गावचे रहिवासी असलेले श्री. गवस हे स्थानिक उमेदवार असल्याने ही त्यांची जमेची बाजू ठरत असून त्यांचा दावा अधिक मजबूत झालाय.
रवीकिरण गवस यांनी शेतकरी, युवक आणि नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वीज समस्या, रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक कार्यालयातील सेवांची उपलब्धता, मोकाट जनावरांचा प्रश्न, तसेच रोजगारनिर्मिती आदी विषयांवर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
तसेच, त्यांनी सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग ठेवला असून, विविध आंदोलनांना प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला आहे. निवडणूक रणनीतीत पारंगत असलेल्या गवस यांनी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीतही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी पुण्यासह कोकणातही उद्योग उभारले असून स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. तसेच ते राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ, नवी दिल्ली या संस्थेमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रदेश महासचिव म्हणूनही ते सक्रिय कार्यरत आहेत.
या पार्श्वभूमीवर माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात रवीकिरण गवस हे एक स्थानिक, सक्षम आणि जनसंपर्कात निपुण युवा नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत. पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.


