– सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे भव्य आयोजन,सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन.
– संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव व संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन निमित्त आयोजन.
– सकाळी ९ वाजता गणेश मंदिर, एस.टी. वर्कशॉप कणकवली येथून होणार दिंडीचे प्रस्थान.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग तर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन उत्सव या वर्षी मोठ्या प्राणात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने एक भव्य वारकरी दिंडी (पालखी सोहळा) कणकवली येथे ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे प्रस्थान सकाळी ८.३० वाजता एस.टी. वर्कशॉप येथील गणेश मंदिरातून होणार असून, परमपूज्य भालचंद्र बाबा महाराज मठ येथे ही दिंडी पोचल्यानंतर त्या ठिकाणी दिंडीचे मेळाव्यात रूपांतर होणार आहेत. जिल्हाभरातील सर्व विणेकरी, ५१ वारकरी पताकाधारी, ३७५ मृदुंगमणी, ३७५ महिला कळस घेऊन, ३७५ तुळस घेऊन महिला वारकरी सहभागी होणार आहेत. तसेच ७५० टाळकरी वारकरी सहभागी होणार आहेत.
दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना “सन्मानपत्र” प्रदान करण्यात येणार आहे. असा सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित केला जात असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्व वारकरी बांधवांनी सकाळी ८.३० वाजता गणेश मंदिर, एस.टी. वर्कशॉप येथे जमावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या ठिकाणी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली असून, ठीक सकाळी ९ वाजता दिंडीचे प्रस्थान होईल. वेळेची मर्यादा सर्वांनी पाळणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ठिकाणी वारकरी कार्यक्रम सुरू आहेत, त्या सर्व ठिकाणी या भव्य सोहळ्याची माहिती देऊन अधिकाधिक वारकरी मंडळींनी या ऐतिहासिक दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.


