दिसपूर : प्राचीन काळात बहुपत्नीत्वाची प्रथा होती, मात्र सध्याच्या काळात क्वचितच लोकांनी दुसरे लग्न केले आहे. अशातच आता आसामध्ये बहुपत्नीत्वावर बंदी घालणारा कायदा तयार करण्यात येत आहे. याबाबतचे विधेयक मंजूर झाल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे. या विधेयकाअंतर्गत दोषी आढळणाऱ्या लोकांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज आसामच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, या विधेयकात सहाव्या अनुसूचीतील क्षेत्रांसाठी काही सूट दिली जाऊ शकते. तसेच आधी ज्या महिलांच्या पतीने दुसरे लग्न केले आहे अशा महिलांसाठी सरकार एक नवीन निधीची घोषणा करणात आहे. याद्वारे त्या महिलांना आपल्या जीवनात पुढे जाण्यास मदत होणार आहे.’
दुसरे लग्न करणाऱ्यांना शिक्षा होणार – हिमंता बिस्वा सरमा
पुढे बोलताना सरमा म्हणाले की, “आसाम मंत्रिमंडळाने आज बहुपत्नीत्वावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचे नाव आसाम बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक, 2025 असे आहे. हे विधेयक 25 नोव्हेंबर रोजी विधानसभेत सादर केले जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने दुसरे लग्न केले तर त्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. तसेच पीडित महिलांच्या कल्याणासाठी आम्ही आर्थिक मदत करणार आहोत.


