- सावंतवाडी : सध्याचे युग हे ‘एआय’ अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे युग आहे. माणूस सद्या चंद्रावर आणि मंगळावर देखील पोहोचलाय. मात्र असे असले तरी समाजामध्ये आजही काही लोकं खूप अंधश्रद्धाळू आहेत, याचा प्रत्यय अनेकदा आला आहे.
- रविवारी रात्री असाच एक प्रकार सावंतवाडी शहरातील असलेल्या कोलगाव येथे घडला आहे. कोलगाव येथील मारुती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका घरात मागील सात ते आठ दिवसांपासून रोज रात्री पूजाअर्चा होत असल्याची बाब तेथील रहिवाशांच्या लक्षात आली.
- दरम्यान दिवसा या घरात अतिशय शांतता असते. मात्र रोज रात्री पूजा करून त्या घराच्या वरच्या मजल्यावर विचित्र प्रकारचे आवाज काढले जातात, अशा आशयाची तक्रार काही रहिवाशी बांधवांनी रविवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस स्टेशनला दिली.
- दरम्यान सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे सदर परिसरात राहणारे सजग नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. जोपर्यंत सदर गंभीर घटनेबाबत पोलिसांकडून कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण पोलीस स्टेशन सोडणार नाहीत, अशी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर रात्री उशिरा घटनास्थळी पोलीस पोहोचले होते व पुढील तपास सुरू आहे.





