फरिदाबाद : भारतात कारवाया करण्यासाठी दहशतवादी संधी साधण्याच्या तयारीत असतात, अशातच आता अनेक राज्यांमध्ये दहशतवादी मॉड्यूल समोर आले आहे. पोलीसांनी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरातमधून अनेक संशयितांना अटक केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेले सर्वजण सर्व डॉक्टर आहेत. गुजरात एटीएसने तिघांना अटक केली आहे. तसेच हरियाणातील फरीदाबाद पोलीस आणि अनंतनाग पोलीसांनी संयुक्त कारवाई करत एका डॉक्टर जोडप्याला अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, या कारवाईतील पहिली अटक अल-फलाह विद्यापीठात शिकवणाऱ्या डॉ. मुझम्मिल शकीलची होती. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी डॉ. शाहीन शाहिदला अटक केली आहे. डॉ. शाहिन शाहिद ही मुझम्मिल शकीलची प्रेयसी असल्याचे बोलले जात आहे. ही महिला हल्ल्याचा कट रचत असल्याचे समोर आले आहे.
महिला डॉक्टरकडे सापडली एके-47 –
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शाहिन शाहिद ही लखनऊची रहिवासी आहे. ती पाकिस्तानमधील दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या संशयास्पद नेटवर्कच्या संपर्कात होती. ती जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचाही आरोप आहे. तिच्या कारमधून AK-47 रायफलमध्येही जप्त करण्यात आली आहे. तसेच ही रायफल मुझम्मिल शकीलने देखील वापरली असल्याची माहितीही समोर आली आहे. आता पोलीसांनी तिच्याशी संबंधित लोकांचीही सखोल चौकशी सुरू केली आहे.
अल-फलाह विद्यापीठाशी संबंध –
डॉ. शाहीन शाहिद ही फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित आहे. या विद्यापीठीशी संबंधित एका प्रकल्पात तिचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तपास संस्था तिच्या लखनऊ, अलीगढ, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरमधील नेटवर्कच्या संबंधांची चौकशी करत आहेत. यानंतर आणखी संशयित दहशतवाद्यांचीही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
डॉ. मुझम्मिल शकीलच्या खोलीत 360 किलो स्फोटके सापडली –
हरियाणातील फरिदाबाद आणि अनंतनाग येथील पोलीसांनी दहशतवादी डॉक्टरांच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. पोलीसांनी डॉ. मुझम्मिल शकीलच्या खोलीतून 360 किलो स्फोटके जप्त केली आहेत. तसेच या घरातून एक वॉकी-टॉकी, 20 टायमर, 20 बॅटरी आणि एक घड्याळदेखील जप्त केले आहे. तसेच या कारवाईत काही रसायने, एक क्रिंकोव्ह असॉल्ट रायफल, एक पिस्तूलही ताब्यात घेण्यत आले आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, अमोनियम नायट्रेट हे स्फोटक सुमारे 15 दिवसांपूर्वी डॉ. मुझम्मिल शकील यांना देण्यात आले होते.
मौलवीच्या घरातून 2563 किलो स्फोटके जप्त –
डॉ. मुझम्मिल शकीलने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी फरिदाबादमधील फतेहपूर तागा गावातील एका घरातून 2563 किलो संशयास्पद स्फोटके जप्त केली आहेत. हे घर हाफिज इश्तियाक नावाच्या व्यक्तीचे आहे, तो एक मौलवी आहे. आता पोलीसांनी इश्तियाकलाही ताब्यात घेतले असून त्याचीही कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.


