- जिल्हाधिकारींच्या आदेशाला न जुमानता काढला मोर्चा.
- सिंधुदुर्गनगरी पोलिसांकडून IPC आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई.
सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून आम्ही भारतीय च्या नावाखाली काही नागरिकांनी मोर्चा काढल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी १३ प्रमुखांसह सुमारे ८० ते ९० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली. ओरोस सिडको सर्कल ते पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग या मार्गावर बेकायदेशीर जमाव जमवून मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ च्या नोटिशीचे उल्लंघन करण्यात आले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नं. 66/2025 असा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 189(2), 190, 223 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(2) व 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्ह्यात आरोपी म्हणून संदीप निंबाळकर (रा. सुकळवाड), जयेंद्र परुळेकर (रा. सावंतवाडी), डॉ. सतीश लळीत (रा. ओरोस, खरेवाडी), महेश परुळेकर (रा. कुडाळ), इजाज नाईक (रा. कुडाळ), रफिक मेमन (रा. सावंतवाडी), सर्फराज शेख (रा. कुडाळ), मोहन जाधव (रा. कुडाळ), एजाज मुल्ला (रा. कुडाळ), आसिफ शेख (रा. बांदा), अब्दुल रजाक शेख (रा. बांदा), असलम खेडेकर (रा. साटेली भेडशी, दोडामार्ग) व कमलताई परुळेकर (रा. पंदूर, ता. कुडाळ) यांचा समावेश आहे.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला आहे.


