वेंगुर्ले : भारताच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर अमीट ठसा उमटविणारे भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त बॅरिस्टर बी. आर. खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ले येथे एक भव्य व प्रेरणादायी काव्यकार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील २५ पेक्षा अधिक नामवंत कवींनी अटलजींच्या तसेच राष्ट्रप्रेरक कवितांचे सादरीकरण करत कवितेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
कवी म्हणून अटल बिहारी वाजपेयी हे अतिशय संवेदनशील, राष्ट्रप्रेमी व दूरदृष्टी असलेले साहित्यिक होते. त्यांच्या कवितांतून मानवी भावना, आशा, संघर्ष आणि देशभक्तीचे प्रभावी दर्शन घडते. “हार नहीं मानूँगा” ही ओळ त्यांच्या आशावादी आणि सकारात्मक विचारसरणीचे प्रतीक ठरते. राजकारणातील कठोर वास्तव आणि काव्यातील हळवेपणा यांचा दुर्मिळ संगम त्यांच्या साहित्यिक योगदानात दिसून येतो, हे या कार्यक्रमातून प्रकर्षाने अधोरेखित झाले.

भारतीय संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास नगराध्यक्ष दिलीप गिरप, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, नगरसेविका अॅड. सुषमा खानोलकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सचिव डॉ. सचिन परुळेकर, कोकण संस्था अध्यक्ष श्री. दयानंद कुबल, समन्वयक शशिकांत कासले, स्वाती मांजरेकर, सत्यवान भगत यांच्यासह विद्यार्थी व साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंदयात्री वाड.मय मंडळ वेंगुर्ले, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग (तुळस) व खर्डेकर कॉलेज वेंगुर्ले यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी उत्स्फूर्त सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी कवींना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीत सादर करून राष्ट्रभक्तीची भावना जागवली तसेच अटलजींच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शशिकांत कासले यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्यप्रेम, राष्ट्रभक्ती व अटलजींच्या राष्ट्रकार्याबद्दल सखोल प्रेरणा निर्माण झाली.


