!!मराठी शाळा!!
शाळा होतील बंद
वरून निरोप येईल,
अ शिकली होती मुले
आ शिकायचा राहून जाईल…
बोटे सारी विखुरतील
कशी जुळेल मुठ?
गुरु – शिष्यांच्या नात्याची
होईल ताटातूट…
दुधासाठी हंबरेल वासरू
कसाई कापेल गाय,
कशी शिकतील माझी मुले
विचारेल शाळा माझी माय…
उदास होईल बाक
टेबलावर साचेल धुळ,
उमलत्या रोपांनी सांगा कसे?
जमीनीत धरावे मुळ..
पांगतील दाही दिशा बालचमू
कसा फुलेल शिक्षणाचा मळा?
चिमुकले चित्रकार होतील वंचित
भिंतीवरती उभ्याने रडेल फळा…
खाजगी शिक्षण होईल महाग
पालकांना कसा पेलेल भार ?
हातावरचे जीवन साऱ्यांचे
गरिबांचे होतील हाल फार…
एकवेळ जेवायची मुले शाळेत
तेवढाच मिठ , मिरचीचा खर्च भागायचा,
शाळे सोबत पोषण आहार बंद
महागाईत जीव कसा जगायचा?
मिळता शिक्षण मायबोलीत
एक एक पिढी शिकून झाली मोठी,
लहानपणीच इतर भाषेत शिक्षण
कसे रुजेल चिमुकल्यांच्या ओठी…
शिकली माय – बाप ज्या शाळेत
ती वास्तू होईल जमिन दोस्त,
शिक्षण गंगेच्या पवित्र व्हरांड्यात
जुगारी , मद्यपींची भरेल मैफिल मस्त…
त्यांचा दोष ह्यांचा दोष
विषय तुर्तास बाजूला ठेवूया,
एकदिलाने, एकजुटीने
चला मराठी शाळा वाचवूया!
✍️ राजेंद्र गोसावी.
आम्ही बालकवी संस्था, सिंधुदुर्ग
9405778726



