परवा एका प्रशिक्षणाच्या निमित्ताने अनेक शिक्षकांशी संवाद साधण्याची संधी प्राप्त झाली. त्यावेळी काही शिक्षकांनी आपले नवोपक्रम सादर करताना, ‘आभासी वर्ग’ आभासी अध्यापन, Augmented technology अशा प्रकारचे उपक्रम सादर केले.
भूकंप झालेला नसताना भूकंपाचा अनुभव किंवा पूर आल्याचा अनुभव तंत्रज्ञानाच्या साहयाने देता येतो असे लक्षात आले. तंत्रस्नेही शिक्षकांशी चर्चा करताना, असेही लक्षात आले की, सध्या रशिया, युक्रेन, जॉर्जिया अशा राष्ट्रातून मेडिकलचे बरेचसे शिक्षण हे अशा आभासी स्वरूपात दिले जाते. मृतदेहाची चिरफाड करून इतर इंद्रियांचा अभ्यास करण्याऐवजी आभासी शस्त्रक्रिया देखील तंत्रज्ञानाच्या साह्याने शिकविल्या जातात.
या लोकांशी जसजशी चर्चा करू लागलो तसा मी गांगरून गेलो. आपले सर्व जीवनच हल्ली आभासी होत चालले आहे. आता तर असे ही ऐकतो की, आभासी प्रियकर व प्रेयसी यांचे प्रेम देखील आभासी होवू शकते. या येणाऱ्या दुनियेत आपण कसे तग धरणार अशी अनामिक भीती वाटू लागली. मी माझ्या एका मित्राजवळ माझी ही भीती व्यक्त केली. त्याने मला समजावले. तो म्हणाला, ” अरे, तू तर आताच आभासी जीवन जगायला सुरुवात केली आहे.” माझ्या लक्षात आले नाही ,हे त्याच्या लक्षात आले म्हणून त्याने विचारले, तुझ्याकडे किती पैसे आहेत ? मी सांगितले असतील एक दोन लाख रुपये. त्याने पुढे विचारले कोठे आहेत मी म्हटले बँकेत आहेत. तू व्यवहार कसे करतोस मी म्हटले फोन पे किंवा गुगल पे ने ! म्हणजे काय करतो तर आपण समजतो मी १००० रुपये पाठवले घेणारा म्हणतो मिळाले. वास्तविक या दोन्ही क्रिया झाल्याच नाहीत. हे सगळ तर आभासीच आहे ना !
मला थोडी भीती वाटू लागली आपले बँकेत, शेअर्स, म्युच्युअल फंडात असलेले पैसे खरेच आहेत कां? हे सर्व आभासीच आहे. कारण मी कधीही हे पैसे पहायला गेलो नाही. सर्व जगच आभासी होत चालले आहे की काय असे वाटू लागले आहे. आपण विद्यार्थ्यांना शिकवितो ते तरी खरे आहे कां? ऑनलाईन व्याख्यान घेताना घेणाराला समाधान की आपण व्याख्यान दिले कोणाला किती समजले किंवा कोणी किती ऐकले कोण जाणे..!
AI च्या मदतीने आपण खूपच मानवी कामे सोपी करणार आहोत असे समजते. आताAI च्या मदतीने मानवाच्या भावभावना समजू लागल्या व त्यानुषंगाने भावनांना प्रतिसादही देता येवू लागला तर मानवी मन व मानवी बुद्धीचे करायचे काय ? असा प्रश्न पडतो. असा प्रश्न पडण्यापेक्षा आपली बुद्धी जास्त चालत नसल्याने तेही आता Chat Gpt ला विचारले , तर त्याने वय विचारले , मी माझे वय सांगितले. त्यावर तिकडून प्रतिसाद आला, “उगी कां डोक्याला त्रास करून घेता ?”
याचा अर्थ हे सर्व आपल्या आकलना पलीकडील आहे. म्हणूनच आपण केवळ मादक पदार्थाच्या सेवनानंतर नशेमध्ये माणसे जशी वावरतात तसे आपणही या आभासी दुनियेत झोकून द्यावे हेच बरे! कारण , आपण तरी खरे जिवंत आहोत की, जिवंत असण्याचा भास आहे हे समजेणासे झाले आहे.
- डॉ. ह. ना. जगताप.


