नरेंद्र डोंगरावर पर्यावरणाचा हरित संकल्प!, ५० गोण्या प्लास्टिक कचऱ्याची सफाई, ५ हजार वृक्षलागवडीचा निर्धार! ; ‘प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर’ मोहिमेची दमदार सुरुवात, वनविभागाचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार!

सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सावंतवाडीच्या निसर्गवैभवाने नटलेल्या नरेंद्र डोंगरावर गुरुवारी पर्यावरण संवर्धनाचा हरित जागर जागविणारा उपक्रम राबविण्यात आला. वनविभागाच्या पुढाकारातून “प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर” या महत्त्वाकांक्षी संकल्पनेची घोषणा करण्यात आली. वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देत तब्बल ५० गोण्या प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून कचरा कुंड्यांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाभरात ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यामध्ये दीड हजार वडवृक्ष आणि साडेतीन हजार औषधी गुणधर्म असलेल्या नरक्या वृक्षांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.


निसर्गरम्य नरेंद्र डोंगरावर पार पडलेल्या या उपक्रमात पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सहसचिव विनायक गावस, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पत्रकार रुपेश हिराप, नागेश पाटील, भूवन नाईक, श्रीरंग सावंत, तनया रेडकर यांच्यासह वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल मिताली कुबल, प्रमोद राणे, वनरक्षक आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री शर्मा म्हणाले, “नरेंद्र डोंगरावर वाढत चाललेला प्लास्टिक कचरा आणि त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर ‘प्लास्टिकमुक्त नरेंद्र डोंगर’ ही संकल्पना राबविण्यात येत असून आज त्याचा शुभारंभ झाला. पुढील पंधरा दिवसांत जिल्हाभरात टप्प्याटप्प्याने पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.”
वनपर्यटनाला चालना देण्यासाठी वनविभागाने विशेष प्रयत्न सुरू केले असून पारपोली, नरेंद्र डोंगर आणि आंबोली येथे पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आगामी आंबोली वर्षा पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र डोंगर येथे ‘वर्षा वन पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थितांना भावनिक साद घालताना सांगितले, “नरेंद्र डोंगरावरील जंगलातून जमा झालेला कचरा हा समाजाला आरसा दाखवणारा आहे. वृक्षारोपण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पिढ्यान्पिढ्या उभ्या असलेल्या वृक्षांचे संवर्धनही गरजेचे आहे. ही झाडे आपले ‘आजी-आजोबा’ समजून त्यांचे संगोपन केले पाहिजे.”
निसर्गसंवर्धनाचा संदेश देणारा आणि पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles