कोलगावमध्ये गुणवंतांचा जल्लोष! ; दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांसह पोलिस दलात निवड झालेल्या कन्यांचा गौरव!

सावंतवाडी : पब्लिक रिलेशन फाउंडेशन सिंधुदुर्गच्या वतीने कोलगाव येथील दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच महाराष्ट्र पोलिस दलात निवड झालेल्या दिपली राऊळ आणि अदिती सावंत यांचा विशेष सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोलगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद मेस्त्री होते. प्रमुख वक्त्या पूनम नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकास यांनाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संस्थेच्या संस्थापक फिजा मकानदार, खजिनदार नासिर मकानदार, ॲड. शितल टिळवे, माजी सैनिक सचिन चव्हाण, शुभारंभ क्लासचे शिक्षक अभिजित सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य सलमा बेगम शेख, जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा कोलगाव नं. २ च्या शिक्षिका सौ. परब मॅडम, मासूम संस्थेच्या प्रतिनिधी अनविता जाधव, अनुभव शिक्षण केंद्राचे साथी सहदेव पाटकर तसेच निरवडे ग्रामपंचायत सदस्य जयराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र पोलिस दलात निवड झालेल्या दिपाली राऊळ (मीरा-भाईंदर) आणि अदिती सावंत (ठाणे) यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापिका फिजा मकानदार यांनी केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी संस्था सातत्याने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि यशस्वी युवतींच्या प्रेरणादायी कामगिरीमुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles