✍️ रूपेश पाटील
मुंबई / सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र राज्यासह कोकणातील बळीराजा विविध संकटांचा सामना करत असताना वाढदिवसाचा कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची त्यांची ही भूमिका सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरत आहे.
नितेश राणे यांनी वाढदिवसानिमित्त होणारे स्वागत समारंभ, सत्कार आणि अन्य उत्सवी कार्यक्रम टाळण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले असून, शेतकरी बांधवांप्रती एकात्मता व्यक्त करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांची कार्यतत्परता, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि जनतेशी असलेली बांधिलकी यांचे कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निरोगी, यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राजकारणात कार्यक्षम नेतृत्व आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या भावना जपणारा लोकप्रतिनिधी म्हणून नितेश राणे यांची ओळख अधिक दृढ होत असून, वाढदिवसाच्या दिवशी घेतलेल्या या संवेदनशील भूमिकेमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सामाजिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे.



