सावंतवाडी : तालुक्यातील सर्व पारंपरिक चिरेखाण व्यावसायिकांनी पेडणे-बार्देश ट्रक ओनर्स असोसिएशनच्या कथित अन्यायकारक धोरणांविरोधात एकत्र येत आमदार निलेश राणे यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात चिरेखाण व्यवसायासमोरील विविध अडचणी मांडण्यात आल्या असून तातडीने हस्तक्षेप करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यातील अनेक कुटुंब पारंपरिक चिरेखाण व्यवसायावर अवलंबून आहेत. शासनाची परवानगी घेऊन हा व्यवसाय सुरू असून याच व्यवसायातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. स्थानिक स्तरावर दगड (चिरे) उत्खनन व विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांवर अलीकडील काही निर्णयांचा विपरीत परिणाम होत आहे.
व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, गोवा राज्यात विक्रीसाठी जाणाऱ्या दगडांच्या वाहतुकीवर पेण्डो-बांदा ट्रक ओनर्स असोसिएशनकडून दबाव टाकला जात आहे. महाराष्ट्र पासिंग असलेल्या वाहनांना अडवणे, आर्थिक दंडाची भीती दाखवणे तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण करणे अशा प्रकारांमुळे व्यवसाय अडचणीत आला आहे.
याशिवाय गोवा राज्यातील खाण विभागाकडून परवान्यांबाबत घालण्यात आलेल्या काही अटी व दंडात्मक कारवाईच्या नोटिसांमुळे चिरेखाण व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परवान्यांच्या अटींमध्ये AL₂O₃ व O₃ संबंधित निकषांचा उल्लेख करून नोटिसा देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चिरेखाण व्यावसायिक संघाने या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांशी चर्चा करून मार्ग काढावा, अन्यायकारक अडथळे दूर करावेत आणि पारंपरिक व्यवसायाला संरक्षण द्यावे, अशी मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली असून लवकरच RTO सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या निवेदनावर संघाचे अध्यक्ष प्रकाश राऊत यांच्यासह अमित प्रभू, मदन सातोस्कर, सुशील कामटेकर, रंजन गावडे, प्रदीप मुळीक, दिगंबर कवठणकर, प्रवीण बर्वे , गिरीश परब, राजेंद्र नाईक, काशीराम मठकर, रामदास परब, गुरुनाथ मोरजकर, रवींद्र गावडे, काशीराम कवठणकर, संजय पालव, मेघश्याम गावडे, सुशील कवठणकर, शुभम परब, अजित कवठणकर, संदेश गावडे, संदीप आजगावकर, यामेश्वर कवठणकर आदींसह अनेक व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चिरेखाण व्यवसायाला न्याय मिळावा आणि वाहतुकीतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.



