सिंधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त उत्साहात पार पडली. यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत आगामी वाटचालीचा आराखडा सभासदांसमोर मांडला.
अध्यक्ष श्री. दळवी यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेला ६०९.४५ कोटी रुपयांच्या नवीन ठेवी प्राप्त झाल्या असून एकूण ठेवींचा आकडा ३,९४२.५७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कोकणातील इतर जिल्हा बँकांच्या तुलनेत १८.२८ टक्के ठेववाढीसह सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रथम क्रमांकावर राहिली आहे.
कर्जवाटपामध्येही बँकेने उल्लेखनीय कामगिरी करत ४७२.०१ कोटी रुपयांची वाढ नोंदवली असून एकूण कर्जव्यवहार ३,२३३.६४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे बँकेचा एकूण व्यवसाय प्रथमच ७,००० कोटींचा टप्पा ओलांडत ३१ मार्च २०२६ अखेर ७,१७६.२१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
बँकेच्या एकूण निधीत ११०.६१ कोटी रुपयांची वाढ होऊन तो ६३३.६४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेने १४९.४३ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळवला असून सर्व आवश्यक तरतुदीनंतर ५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे.
बँकेचे ढोबळ एनपीए (Gross NPA) केवळ ३.४५ टक्के असून निव्वळ एनपीए (Net NPA) शून्य टक्के आहे. तसेच भांडवल पर्याप्तता (Capital Adequacy Ratio) ११.९२ टक्क्यांवर पोहोचली असून बँकेला यंदाही वैधानिक लेखापरीक्षणात ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक, ग्रामीण कारागीर, युवक, महिला आणि सर्वसामान्य ग्राहकांना दर्जेदार बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बँक सातत्याने कार्यरत असल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले. विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी बँकेने अनेक उपक्रम राबविले असून केंद्र शासनाच्या विकास संस्था सक्षमीकरण प्रकल्पात बँकेच्या कामगिरीची राज्यभर दखल घेण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विकास संस्थांचे १०० टक्के संगणकीकरण करण्यासाठी बँकेने विशेष मोहीम हाती घेतली असून संगणकीकरण पूर्ण करणाऱ्या सचिवांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबविण्यात आली आहे. आधुनिक बँकिंगच्या गरजा लक्षात घेऊन ग्राहकांना राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे सर्व डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महिलांचा बँकिंगमधील सहभाग वाढावा यासाठी सध्या ४४ ‘बँक सखी’ कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्यात येत आहे. तसेच AEPS (आधार सक्षम पेमेंट प्रणाली) सुविधा सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मायक्रो एटीएमद्वारे ग्रीन चॅनेल आणि वृद्ध, अपंग व आजारी नागरिकांसाठी ‘डोअर स्टेप बँकिंग’ सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
बँक केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित न राहता पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण, स्वयंसेवी संस्थांमार्फत विकासकामे, बचत गटांना प्रशिक्षण व विपणन सहाय्य तसेच ‘बालसिंधू दत्तक योजना’द्वारे कुपोषित बालकांना वैद्यकीय मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांतूनही आपली सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे श्री. दळवी यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील सभासद संस्था, ठेवीदार, कर्जदार आणि ग्राहक यांच्या सहकार्यामुळे बँकेची सातत्याने प्रगती होत असून येत्या आर्थिक वर्षअखेर बँकेचा एकूण व्यवसाय ८,५०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. सहकारी चळवळीला अधिक बळकटी देत ग्राहकाभिमुख सेवांच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार, महिला, विद्यार्थी आणि सर्व वयोगटातील ग्राहकांना उत्कृष्ट बँकिंग सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.



