सावंतवाडी : कृषी दिनाचे औचित्य साधत नेमळे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी उपयुक्त ठरणाऱ्या फावड्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सध्या नेमळे गावात भातलावणीची कामे वेगाने सुरू असून, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकरी आधीच अनेक अडचणींना सामोरे जात आहे. त्यातच शेतीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्री, अवजारे, खते आणि इतर साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे शेती करणे अधिक खर्चिक झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपयोगी पडेल अशी भेट देण्याचा निर्णय नेमळे ग्रामपंचायतीने घेतला.
याअंतर्गत गावातील सर्व शेतकऱ्यांना फावड्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे शेतकऱ्यांनी मनापासून स्वागत करत ग्रामपंचायतीचे आभार मानले.
यावेळी सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, ग्रामसेवक चौहान, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच नेमळे गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे कृषी दिनाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली असून, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.



