संघर्षाच्या ठिणगीतून उभा राहिला विकासाचा दीपस्तंभ! ; दिवंगत पत्रकार लक्ष्मण ठाकूर यांच्या लढ्याची साक्ष देणारा ‘पालदाड पूल’ आजही पुरात ठरतोय १४ गावांसाठी जीवनदायिनी! ; जनआंदोलनाच्या विजयाचा जिवंत इतिहास.

✍️ शशिकांत मोरे.

रोहा : गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत केले असताना, रोहा तालुक्यातील पालदाड पूल मात्र संकटाच्या काळात हजारो नागरिकांसाठी आशेचा दीप बनून उभा आहे. पुराच्या पाण्यालाही छाती ठोकून तोंड देत हा पूल आजही रोहा–अष्टमी परिसरातील १४ गावांचे दळणवळण अखंड सुरू ठेवत आहे. या पुलावरून सुरू असलेली सुरळीत वाहतूक म्हणजे केवळ विकासाचे प्रतीक नाही, तर दिवंगत पत्रकार लक्ष्मण ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेल्या ऐतिहासिक जनसंघर्षाचा जिवंत वारसा आहे.
आज या पुलावरून सहज प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात दिवंगत पत्रकार लक्ष्मण ठाकूर यांची आठवण अभिमानाने जागी होते. कारण हा पूल शासनाने सहज उभारलेला नाही, तर हजारो नागरिकांच्या अश्रू, संघर्ष, आंदोलन आणि जिद्दीच्या बळावर साकारलेले स्वप्न आहे.
एकेकाळी कुंडलिका नदीच्या पलीकडील १४ गावांतील नागरिकांना पावसाळ्यात संपर्क तुटल्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. दगडी पूल पाण्याखाली गेल्यानंतर अष्टमीमार्गे अनेक किलोमीटरचा वळसा घालत गाव गाठावे लागे. रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत असत.
याच वेदनेतून उडदवणे येथील दिवंगत पत्रकार लक्ष्मण ठाकूर यांनी पालदाड येथे पूल उभारण्याचा ध्यास घेतला. त्यांच्या सोबत अंबाजी कोलाडकर, पुतळाजी कोलाडकर, विठ्ठल ठाकूर, धनाजी लोखंडे, खेळू ढमाल आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांनी एकजूट करत निवेदने, रास्ता रोको, धरणे, उपोषण आणि तीव्र जनआंदोलन उभारले. अखेर या संघर्षापुढे प्रशासनाला झुकावे लागले.
१९९५ ते १९९९ या शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री लिलाधर डाके यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुलाच्या कामाला गती मिळाली. तत्कालीन आमदार सुनील तटकरे यांनीही मंजुरी, निधी आणि पाठपुरावा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर पालदाड पुलाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.
आज हा पूल केवळ दोन किनाऱ्यांना जोडत नाही, तर हजारो कुटुंबांचे जीवन जोडतो. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे, शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत नेणे, विद्यार्थ्यांचा प्रवास आणि दैनंदिन व्यवहार या सर्वांसाठी हा पूल जीवनवाहिनी ठरला आहे.
गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसात अनेक मार्ग बंद पडले, तरी पालदाड पूल दिमाखाने उभा राहून वाहतूक सुरू ठेवत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आजही कृतज्ञतेने म्हणतात—”हा पूल फक्त सिमेंटचा नाही; तो आमच्या संघर्षाचा, स्वाभिमानाचा आणि दिवंगत पत्रकार लक्ष्मण ठाकूर यांच्या जिद्दीचा अजरामर स्मारक आहे.”
पालदाड पूल हा विकासाचा केवळ प्रकल्प नाही; तो जनशक्तीच्या विजयाची, लोकएकजुटीच्या सामर्थ्याची आणि एका पत्रकाराने समाजासाठी उभारलेल्या ऐतिहासिक लढ्याची कायम स्मरणात राहणारी गौरवगाथा आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles