✍️ शशिकांत मोरे
रोहा : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीचे (एमआयडीसी) अक्षरशः जलनगरीत रूपांतर केले आहे. अब्जावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या औद्योगिक पट्ट्यात मुख्य आणि अंतर्गत रस्ते तुडुंब पाण्याखाली गेल्याने उद्योगविश्वाचे चाकच थांबले आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा व्हावा म्हणून लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला नाला पहिल्याच मोठ्या पावसात निष्प्रभ ठरल्याने “कोट्यवधींचा निधी अक्षरशः पाण्यात गेला का?” असा संतप्त सवाल आता कारखानदार, कामगार आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
‘रस्ते खाली… नाले उंच’; अभियांत्रिकी की नियोजनाचा विनोद?
औद्योगिक वसाहतीतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, नव्याने बांधण्यात आलेल्या नाल्याची उंची अनेक ठिकाणी रस्त्यांपेक्षा अधिक असल्याचा आरोप स्थानिक उद्योजकांनी केला आहे. परिणामी रस्त्यावर साचलेले पाणी नाल्यात जाण्याऐवजी नाल्यातील पाणीच उलट रस्त्यांवर साचत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण वसाहतीला तलावाचे स्वरूप आले असून, अभियांत्रिकीच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बँका, पोस्ट ऑफिस, पोलीस ठाणेही जलमय –
सामायिक सुविधा केंद्र परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, धाटाव पोलीस ठाणे, पोलीस वसाहत, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तसेच अनेक उद्योगांमध्ये पाणी शिरल्याने कामकाज विस्कळीत झाले. सांडपाणी आणि पावसाचे पाणी एकत्र मिसळल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून हिरवट रंगाचे पाणी सर्वत्र साचल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कामगारांची पाण्यातून जीवघेणी वाटचाल –
तीन ते चार फूट पाण्यातून कामगारांना जीव मुठीत धरून कामावर जावे लागत आहे. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने बंद पडल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही उद्योगांच्या गोदामात आणि उत्पादन विभागात पाणी शिरल्याने कच्चा माल आणि यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अब्जावधी रुपयांच्या औद्योगिक उत्पादनालाही या जलसंकटामुळे मोठा फटका बसला आहे.
सांडपाण्यामुळे आरोग्याचाही धोका –
रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात अनेक ठिकाणी सांडपाणी मिसळल्याने कामगार आणि नागरिकांना त्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. या दूषित पाण्यामुळे अनेकांना त्वचेचे विकार, अंगाला खाज सुटणे अशा तक्रारी जाणवत असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण परिसरात पसरलेल्या रंगीबेरंगी सांडपाण्यामुळे औद्योगिक वसाहतीचे विदारक चित्र समोर आले आहे.
झुडपांचा विळखा, अपघातांना निमंत्रण –
औद्योगिक वसाहतीतील अनेक रस्त्यांलगतची झाडे वेळेत छाटली न गेल्याने त्यांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या आहेत. त्यातच अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही या निष्काळजीपणामुळे अनेक अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
‘नाला झाला… पण उपयोग काय?’
“पावसाळ्यापूर्वी सर्व तयारी पूर्ण केली,” असा दावा करणाऱ्या प्रशासनाचा फुगा पहिल्याच पावसात फुटल्याची टीका होत आहे. माझदा कंपनीपासून जैनवाडीपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नाल्यामुळेच जर पाणी रस्त्यावर साचत असेल, तर त्या कामाचा नेमका उपयोग काय? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांनी उपस्थित केला आहे.
चौकशीची मागणी जोरात –
या संपूर्ण प्रकरणात निकृष्ट दर्जाचे काम, तांत्रिक त्रुटी आणि नियोजनशून्यता यांची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी या गंभीर परिस्थितीवर कोणती भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.



