बांदा उड्डाणपूल भ्रष्टाचार प्रकरणी सदर कंत्राटदारास ‘ब्लॅक लिस्ट’चा इशारा! ; ….अन्यथा मंत्रालयीन कारवाई!, ; माहिती अधिकार  पदाधिकारी सुशिल चौगुले यांचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास पत्र. ; वादग्रस्त पुलाच्या बांधकामावरून कंत्राटदारावर गंभीर आरोप!

सावंतवाडी : राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीतील वादग्रस्त पुलाच्या बांधकाम प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. माहिती अधिकार महासंघाचे सावंतवाडी तालुका प्रमुख सुशिल चौगुले यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना समजपत्र देत संबंधित कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्ट’ मध्ये समाविष्ट करण्याची आणि पुलाच्या बांधकामासाठी झालेला खर्च त्याच्याकडून वैयक्तिकरित्या वसूल करण्याची मागणी केली आहे.

समजपत्रात नमूद केल्यानुसार, संबंधित पुलाच्या बांधकामाबाबत यापूर्वीही भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत लेखी तक्रारी आणि पुरावे सादर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही संबंधित कंत्राटदाराविरोधात कोणतीही प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, या प्रकरणामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाची प्रतिमा मलिन होत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून कंत्राटदाराविरुद्ध कठोर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

समजपत्राद्वारे संबंधित कंत्राटदाराला सात दिवसांच्या आत ब्लॅक लिस्टमध्ये टाकून पुलाच्या बांधकामाचा खर्च त्याच्याकडून वसूल करावा, अन्यथा सर्व पुराव्यांसह मंत्रालयीन स्तरावर तक्रार दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

या समजपत्राची प्रत माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत पुढील कार्यवाहीसाठी नोंदविण्यात येणार असल्याचेही सुशील चोगुले यांनी नमूद केले आहे.

( टीप : ही बातमी समजपत्रात करण्यात आलेल्या दाव्यांवर आधारित असून, संबंधित कंत्राटदार किंवा विभागाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. ती प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles