मूल्यनिष्ठ आदर्श नेतृत्व, शिक्षणप्रेम अन् माणुसकीचा जागवला स्मृतिगंध! ; विकासभाई सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भावनांनी दाटला राणी पार्वतीदेवी विद्यालयाचा परिसर.

सावंतवाडी : शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारण या चारही क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा अढळ ठसा उमटवत हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे, असंख्य कार्यकर्त्यांना आधार देणारे आणि मूल्यनिष्ठ नेतृत्वाचा आदर्श निर्माण करणारे कै. विकासभाई भालचंद्र सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेला ‘विकासभाई – एक आश्वासक पर्व’ हा स्मरणसोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. विकासभाईंच्या कार्याचा, विचारांचा आणि संस्कारांचा जागर करणाऱ्या या कार्यक्रमात प्रत्येक वक्त्याच्या शब्दांत कृतज्ञतेचा, अभिमानाचा आणि भावनांचा ओलावा जाणवत होता.

शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की, स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या मूल्याधिष्ठित नेतृत्वाचे संस्कार घेऊन विकासभाईंनी तब्बल तीन दशकांहून अधिक काळ शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रांत विधायक कार्य केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून राज्याच्या सहकार क्षेत्रापर्यंत त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे निर्व्यसनी, शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम जीवन आजच्या युवा पिढीसाठी दीपस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले.

विकासभाईंनी उभारलेला शैक्षणिक वटवृक्ष आज हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि भविष्याची दिशा देत असल्याचे सांगताना विक्रांत सावंत म्हणाले, “मी अध्यक्ष असलो तरी या संस्थेचा खरा आधारस्तंभ उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, शालेय समितीचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक आणि कर्मचारी आहेत. विकासभाईंच्या विचारांचा वारसा आणि वसा जपत विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक सक्षम, संस्कारक्षम आणि उज्ज्वल करण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध राहील.”

संस्थेचे सचिव व्ही. बी. नाईक यांनी विकासभाईंच्या खंबीर नेतृत्वाच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, “मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत निर्भयपणे काम करण्याचा आत्मविश्वास विकासभाईंनी दिला. ‘प्रामाणिकपणे काम करा, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,’ हा त्यांचा विश्वासच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.” कोणत्याही विषयाचा कायदेशीर, प्रशासकीय आणि व्यावहारिक अभ्यास करून अचूक मार्गदर्शन करणारे विकासभाई म्हणजे ‘चालता-बोलता विश्वकोश’ होते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

संस्थेचे सदस्य प्रा. सतीश बागवे यांनी विकासभाईंच्या समर्पणाची आठवण सांगताना भावनिक शब्दांत नमूद केले की, शिक्षकांच्या प्रगतीसाठी ते नेहमीच पाठीशी उभे राहत. संस्थेतील प्रत्येक विकासकामात ते स्वतः झोकून देत असत. “बांधकामावर पाणी मारण्यापासून ते प्रत्येक विटेची, प्रत्येक कामाची पाहणी करण्यापर्यंत त्यांचा सहभाग असे. आज या संस्थेच्या प्रत्येक विटेवर, प्रत्येक वाळूच्या कणावर आणि प्रत्येक दगडावर विकासभाईंच्या कष्टांचे नाव कोरलेले आहे,” असे सांगत त्यांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.

डॉ. नितीन सावंत यांनी विकासभाईंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना सांगितले की, पहिल्याच भेटीत समोरच्या व्यक्तीला आपलेसे करणारे आणि भारावून टाकणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विकासभाई सावंत. शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारण या सर्वच क्षेत्रांतील त्यांचे योगदान अमूल्य असून, तळागाळातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आयुष्यभर दूरदृष्टीने कार्य केले. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षी होते. त्यांचे अकाली निधन ही केवळ एका संस्थेची नव्हे, तर संपूर्ण समाजाची मोठी हानी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

चित्रकला स्पर्धेतील विजेते :
कु. युगा अनिल गुंजाळ, कु. कार्तिकी रामा सावंत, कु. शुभ्रा मनोज खाडिलकर, कुमार सोहम बापूशेठ कोरगावकर, कुमार गौरांग सदाशिव सावंत, कु. रेवा राकेश बांदेकर, कु. नमिता मिलिंद मडव आणि कु. मृण्मयी पाटील.

वक्तृत्व स्पर्धेतील विजेते :
कु. जान्हवी विश्वास पाटील, कु. प्रणाली राजन घाटकर, कु. अस्मी प्रवीण मांजरेकर, कु. रेश्मा संदेश पालव आणि कु. प्रज्ञा तुषार मोर्ये.

या भावपूर्ण स्मरणसोहळ्यास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, सदस्य प्रा. सतीश बागवे, संदीप राणे, चंद्रकांत सावंत, वसुधा मुळीक, छाया सावंत, स्नेहा परब, डॉ. नितीन सावंत, सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर, संदीप भराडे, मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सुमेधा नाईक, प्रभारी उपप्राचार्या सविता माळगे, पर्यवेक्षक नामदेव मुठे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वामन ठाकूर यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.

प्रत्येकाच्या मनात एकच भावना दाटून आली—’माणूस जातो, पण त्याचे विचार, संस्कार आणि कार्याची प्रेरणा कायम समाजाला दिशा देत राहते.’ विकासभाई सावंत यांचे व्यक्तिमत्त्व हे अशाच प्रेरणेचे अखंड, आश्वासक आणि तेजस्वी पर्व ठरल्याचे या स्मरणसोहळ्यात अधोरेखित झाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles