मालवण : तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेने राबविलेल्या विविध उपक्रमांनी प्रभावित होऊन ओझर विद्यामंदिरच्या विकासामध्ये आपलाही वाटा असावा या उद्देशाने संविधान दिनाचे औचित्य साधून रेवंडी गावातील सध्या मुंबईस्थित रहिवाशी असलेल्या श्रीमती स्नेहप्रभा मनोहर कांबळी यांच्यावतीने सुरेंद्र मनोहर कांबळी यांनी ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेला प्रथमोपचार साहित्य व संगणक संच मुंबईहून पाठवून दिला. सुरेंद्र कांबळी यांचे बंधू चंद्रशेखर कांबळी, त्यांची पत्नी श्रावणी तसेच मुलगी निष्ठा कांबळी यांनी हे प्रथमोपचार साहित्य व संगणक संच शाळेकडे नुकताच सुपूर्द केला. याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य विजय कांबळी ज्यांनी सुरेंद्र उर्फ बाळा कांबळी यांच्या दानशूरपणाबद्दल गौरवोद्गार काढले. त्या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशालेला प्रथमोपचार साहित्य व संगणक संच दिल्याबद्दल प्रशालेच्यावतीने शाळेचे साहाय्यक शिक्षक पी. के. राणे यांनी कांबळी कुटुंबीयांचे आभार मानले.


