मालवण : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये सुप्रसिद्ध संगीतकार सोमनाथ परब यांचा नुकताच विद्यार्थ्यांसाठी संगीतविषयक मार्गदर्शन वर्ग संपन्न झाला. त्यांनी ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना काही समूहगीते साभिनय शिकवली. त्यांना तबल्याची साथ आदर्श संगीत विद्यालय मालवणचे संचालक मंगेश कदम यांनी दिली.
यावेळी समूहगीते विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेताना सोमनाथ परब यांनी संगीतातील सूर, ताल व लय यांविषयी माहिती दिली. संगीतविषयक धडे देताना त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्वही सांगितले. संगीतकार सोमनाथ परब यांच्या गाणी शिकवण्याच्या कौशल्यामुळे कधीही गाणी न म्हणणारे विद्यार्थी तालासुरात समूहगीते म्हणताना पाहून शाळेतले शिक्षकही आश्चर्यचकित झाले. या मार्गदर्शन वर्गामुळे शाळेतील संगीतप्रेमी शिक्षकांनाही संगीताचे धडे मिळाले. ओझर विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी अनेक समूहगान स्पर्धांमध्ये यश मिळविल्याचे ऐकून सोमनाथ परब यांनी समाधान व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थ्यांचा संगीताविषयी उत्साह पाहून पुढच्या वेळी दोन दिवसांचा मार्गदर्शन वर्ग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मालवण तालुक्यातील संगीतप्रेमी शिक्षकांसाठी गीतमंचाचा वर्ग घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सूतोवाच केले. ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांकडून समूहगीतांचा सराव करून घेण्यासाठी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांची सीडी व गाण्याचे पुस्तक प्रशालेला भेट दिले. या मार्गदर्शन वर्गाप्रसंगी यांचे सहकारी रामदास पालव व विनोद सावंत हे सुद्धा उपस्थित होते. तसेच त्यांचे संगीतविषयक मार्गदर्शन ऐकण्यासाठी संगीत प्रेमी विजय बोवलेकर, रत्नाकर कोळंबकर व बबन परुळेकर उपस्थित होते . या मार्गदर्शन वर्गाचा ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना चांगला लाभ झाला. या संगीत विषयक मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यासाठी ओझर विद्यामंदिरचे संगीतप्रेमी शिक्षक प्रवीण पारकर यांनी भरपूर मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पारकर यांनी तर आभार पांडुरंग राणे यांनी मानले.
ADVT –




