सावंतवाडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडीतर्फे संत रोहिदास यांची 647 जयंती शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सावंतवाडी येथे साजरी करण्यात आली. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक देविदास बोर्डे व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष केशव जाधव होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा .बोर्डे यांनी संत परंपरेचा इतिहास सांगून संत रविदास यांनी सहाव्या शतकात भक्तीचे व्रत अंगीकारून राष्ट्रीय एकात्मतेसाठी कोणते कार्य केले हे स्पष्ट केले. मंदिर, मस्जिद एकच आहे असा संदेशही त्यांनी दिला आणि समाज जोडण्याचे काम केले हे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या अनुयायांना गुलामीत राहू नका, असा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगून माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो हे स्पष्ट केले.
यावेळी केशव जाधव, परशुराम चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम असनकर यांनी केले तर सुरेश जाधव यांनी आभार मानले. यावेळी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


