सावंतवाडी : सातार्डा पंचक्रोशीतील तरचावाडा येथील श्री देव महापुरुष मंदिराच्या पारावर सार्वजनिक सत्यनारायण पूजनोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे झालेल्या या कार्यक्रमांमध्ये दुपारी महाप्रसाद व सायंकाळी श्री सत्यनारायण तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी महापूजेचा मान गणेश उर्फ दाजी मांजरेकर उभयतांना मिळाला तर पूजेचे पौराहित्य पुरोहित धुपकर यांनी केले.
सकाळी अभिषेक झाल्यानंतर दुपारी ब्राह्मण भोजन महाप्रसाद आणि त्यानंतर सायंकाळी श्री सत्यनारायण पूजनोत्सवासाठी सुरुवात झाली. पूजन उत्सवानंतर महाआरती त्यानंतर तीर्थप्रसाद व त्यानंतर पावनीचा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे या फळ फळावरांमध्ये नारळाची पेंड, कलिंगड, केळीचे घड, सफरचंद आदी फळांमध्ये पावणीत खास नाशिकहून आणलेल्या तीन प्रकारच्या द्राक्षांचे गुच्छ लावण्यात आले होते.

या श्री देव महापुरुष पारावरील सत्यनारायण पूजा उत्सवासाठी गोवा सिंधुदुर्ग सह मुंबई पुणे येथील चाकरमनी सुद्धा दाखल झाले होते. हा उत्सव बागकर, मांजरेकर, शिरसाट, पाटकर, घुरे, पिळणकर, गोवेकर, कुडतरकर, केरकर, शिरोडकर तानावडे आदी कुटुंबीयांकडून एकत्रित येऊन साजरा केला जातो.
रात्रौ मळगाव येथील श्रीदेवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ यांचा घृष्णेश्वर तीर्थक्षेत्र या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाच्या नाटकानंतर या वार्षिक धार्मिक कार्यक्रमाचे सांगता झाले. दरम्यान महापुरुष मंदिराच्या पारावर पत्रे बसवण्याचे काम सुरू असून याकरिता भाविकांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन देवस्थान उपकमिटीच्या वतीने करण्यात आले आहे


