जालना : ”मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठून काढलं?”, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या संभाजी भिडे यांनी केलंय. भिडेंच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. मनोज जरांगे पाटलांनीही भिडेंच्या वक्तव्याला आक्षेप घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ”फडणवीसांनी हे नवं अस्त्र बाहेर काढलंय”, असं जरांगे म्हणाले. तर जंगल आमचं, वाघ आरक्षणाची शिकार करेल असेही ते म्हणाले. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, जंगल आमचं आहे वाघ आरक्षणाची शिकार करेल. फडणवीसांनी हे नवीन अस्त्र काढलं वाटतंय..पण यांचा झेंडा उचलून कल्याण होणार नाही त्याला आरक्षणच लागेल. आम्ही पण छत्रपतींच्या विचारांचे हिंदू आहोत.
छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केला पाहिजे : मनोज जरांगे.
छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केला पाहिजे, असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. नाशिकच्या सभेत फक्त आठ हजार लोक आले होते, अशी टीका भुजबळांनी केली होती. जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घाणीला घाणच ऐकू येणार आहे. भुजबळांनी आम्हाला संस्कार शिकवण्याची गरज नाही. आम्ही रिपोर्टला किंमत देत नाहीत. नाशिक त्याला दाखवून देईल किती लोक होते तर असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर टीका केली आहे.
लोकसभेला कार्यक्रम केला आता विधानसभेलाही करून घ्या : मनोज जरांगे
सोलापूरला किती पब्लिक होती किती दाखवली हे माहित आहे. लोकसभेला कार्यक्रम केला आता विधानसभेलाही करून घ्या. छगन भुजबळ काय सांगतो हे आम्हाला महत्वाचं नाही नाशिक त्याला दाखवून देईल सगळे सिट पाडून, असे देखील मनोज जरांगे म्हणाले.


